सोलापूर : चालत्या रेल्वेमध्ये वस्तू विक्री करण्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यावसायिकाने दुसऱ्या महिला व्यावसायिकावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. यामुळे तिचा चेहरा रक्तबंबाळ झाला. ही घटना सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास उद्यान एक्सप्रेस मध्ये दुधनी गावाजवळ घडली. लक्ष्मी कुमार वनारसे (वय ४५, रा. भूषण नगर, रामवाडी,सोलापूर) असे जखमी महिलेचे नाव आहे.
यातील जखमी महिला गेली पंधरा वर्षापासून रेल्वेमध्ये महिलांच्या सौंदर्यप्रसाधनाचे साहित्य विक्री करून आपली उपजीविका करते. चाकूने वार करून जखमी करणारा दुसरा व्यावसायिक एम व्यंकटेश हा सुद्धा रेल्वेमध्ये यापूर्वी पुस्तके विकत होता. काही दिवसांपूर्वी त्याने हा व्यवसाय सोडून सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य विकायला सुरुवात केले होते. यावरून जखमी लक्ष्मी आणि एम व्यंकटेश यांच्यामध्ये यापूर्वी अनेकदा किरकोळ बाचाबाची झाली होती.
सोमवारी सकाळी उद्यान एक्सप्रेसमध्ये ग्राहकाला साहित्य विक्री करताना दोघांमध्ये कुरबुर झाली. यातूनच व्यंकटेश याने चाकुने चेहऱ्यावर, हातावर वार करून गंभीर जखमी केले . तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याची सिव्हील पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.