सोलापूर : वडाळा (ता. उ. सोलापूर) येथील ग्रामीण रुग्णालयात मागील काही दिवसांपासून वैद्यकीय सेवासुविधा मिळेनासे झाल्या आहेत. दरम्यान, प्रसूतीसाठी आलेल्या महिलांनाही उपचार न करता थेट सोलापूरला घेऊन जाण्याचा सल्ला देतात. एवढेच नव्हे तर या रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नाही, वैद्यकीय अधिकारी या नात्याने कोणतेही नियंत्रण कर्मचाऱ्यांवर नसल्याने कर्मचारी निष्काळजीपणे वागतात अशी माहिती जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
उत्तर सोलापूर तालुक्याच्या २० गावातील रुग्णांना रुग्ण सेवा मिळण्यासाठी वडाळ्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाची सुविधा उभारण्यात आली. या रुग्णालयामध्ये दररोज ३०० ते ४०० लोक रुग्णसेवा घेतात. परंतु ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना रुग्णसेवा वेळेवर दिली जात नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यासह कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे रुग्णांना ताटकळत बसावे लागते. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना रुग्णालयात तपासणी करून दाखल करून न घेता सोलापूरला पाठवले जाते. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. प्रसूतीसाठी सर्व सुविधा रुग्णालयात उपलब्ध असताना महिलांना दाखल करून घेतले जात नाही. वैद्यकीय अधिकारी मात्र रुग्णांना सेवा न देता पाणीच नाही, बीपीच वाढला, ठोकेच बंद आहेत, प्रसूती करणारे डॉक्टरच नाहीत अशी वेगवेगळे कारणे सांगून रुग्णांना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला पाठविले जाते अशीही तक्रार बळीराम साठे यांनी केली.
----------
कर्मचारी नसतात मुख्यालयात...
आपापसातील मतभेदामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. कोणतेही कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत. परिणामी कर्मचारी निवासासाठी बांधलेल्या निवासाची दुरवस्था झालेली असून रुग्णांना रात्री अपरात्री वेळेवर सेवा दिली जात नाही. वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी हे येणाऱ्या रुग्णांसोबत उद्धट वर्तन करतात असाही आरोप वडाळा ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल माळी यांनी केला आहे.
----------
वडाळा ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांच्या रिक्त जागा आहेत, त्याजागी एक जरी वैद्यकीय अधिकारी दिला तर आम्ही व्यवस्थित काम करू. रूग्णांना वेळेत सेवा देऊ. आपल्या स्तरावर ग्रामपंचायतीचा ठराव वरिष्ठ पातळीवर देऊन त्यासाठी पाठपुरावा करावा असे ग्रामस्थांना सुचविले आहे.
- विकास माने, वैद्यकीय अधिकारी, वडाळा, ता.उ.सोलापूर
----------
रुग्णांचे आर्थिक नुकसान
रुग्णालयात रक्त व लघवी तपासण्यासाठी प्रयोगशाळा असूनही तपासणी केली जात नाही, ती बाहेर तपासणीसाठी पाठवले जाते. त्यामुळे रुग्णांचे आर्थिक नुकसान होते. एवढेच नव्हे सर्वच सेवासुविधा केंद्रात असताना रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्लाही पद्धतशीरपणे दिला जात असल्याचेही उपसरपंच प्रभाकर गायकवाड यांनी सांगितले.
----------
रुग्णालयाचा कारभार शिस्तप्रिय होऊन रुग्णांना वेळेवर योग्य औषध उपचार व सुविधा न मिळाल्यास चार दिवसात ग्रामीण रुग्णालयासमोर आंदोलन करून रुग्णालयास टाळे ठोकले जाईल. यापूर्वी अनेकवेळा याबाबत तक्रारी दिल्या तरी वरिष्ठ याकडे दुर्लक्ष करतात. मात्र आता दुर्लक्षपणा खपवून घेतला जाणार नाही.
- बळीराम साठे, माजी जि.प. विरोधी पक्षनेते, सोलापूर