सोलापूर : रात्रीच्या वेळी एकटाच दुचाकीवन घराकडे जाणाऱ्या वृद्धाला गाठून त्याची सोनसाखळी चोरणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून मार्केट यार्डजवळील गाळ्यात गाठून त्याला जेरबंद केले. विनोद विठ्ठल भोसले (वय- २७, रा. सग्गम नगर, जुना विडी घरकूल, सोलापूर) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.
२३ फेब्रुवारीच्या रात्री ॲटलॉन्स अपेक्समध्ये राहणारे रमेश संगणबसय्या नंदीमठ हे त्यांचा मित्र चन्नप्पा कुरे याला भेटून माणिक चौकमार्गे घराकडे दुचाकीवरुन निघाले होते. सराईत चोरट्यानं त्यांना शिंदे चौकातील काळी मशिजवळील रोडवर गाठून गळ्याला हिसका मारुन १७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरुन पोबारा केला. या गुन्ह्याच्या आरोपीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते.
२६ फेब्रुवारी रोजी सपोनि दादासो मोरे यांच्या पथकाला संबंधीत चोरटा सोन्याची चेन विकण्यासाठी मार्केट यार्ड येथील गाळा नं. २५६ येथे विनानंबर प्लेट असलेल्या दुचाकीवरुन येणार असल्याची टीप मिळाली. लागलीच पथकाकडून सापळा लावण्यात आला. नमूद वर्णनाचा चेन स्नचर विनोद आढळला त्याला. शिताफीनं ताब्यात घेऊन विश्वासात घेतले. त्याने सदरची चेन चोरल्याची कबुली देऊन पोलिसांच्या हवाली केली. त्यानुसार १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला गुन्हा उघडकीस आणण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीेल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दादासो मोरे, पथकाने केली.
पोलिसांचे आवाहन
रात्रीच्या सुमारास प्रवास करताना मौल्यवान दागिने घालणे टाळावे. दुचाकी वा अन्य वाहन चालवताना आजूबाजूच्या परिसराचा कानोसा घेऊन सतर्क राहावे. आपल्या अवतीभोवती संशयास्पदरित्या वावरणाऱ्यांवर लक्ष ठेवावे. गरज भासल्याच नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी केले आहे.