सोलापूर : वडिलांनी बोलविल्याचे सांगून नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीस घराबाहेर नेऊन तिच्या गालात मारुन तोंडाला बोचकारे घेतले. या प्रकरणी जिल्ह्यातून तडीपार असलेला विनोद श्रावण पवार याच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून न्यायालयात उभे केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
१७ जुलै रोजी मध्यरात्रीही घटना घडली. याबाबत पीडित मुलींच्या नातेवाईकांनी पोलिसात फिर्याद दिली असून तडीपार विनोद श्रावण पवार (बार्शी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सिरसाट यांनी अटक केली. त्याला बार्शी न्यायालयात हजर केले होते.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, सोमवार, १७ जुलै रोजी रात्री घटनेच्या दिवसी मुलीचे आईवडील भंगार गोळा करण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडले. त्यावेळी मुलगी घरात झोपलेली होती. जाताना घराला बाहेरून कडी न लावता ते तसेच गेले. काही वेळांनी ते परत येताच मुलगी घरात दिसली नाही. त्यांनी तिचा शोध घेताना एका ठिकाणाहून तिचा रडण्याचा आवाज आला. तेथे मुलगी दिसली.
तिला घटनेबाबत विचारले असता, आरोपीने घरात प्रवेश केला. 'तुझ्या वडिलांनी तुला घेऊन येण्यास सांगितले आहे' असे म्हणून तिला घराबाहेर नेले. एकाठिकाणी नेऊन चापटा मारून बोचकारल्याचे सांगितले. ही घटना ऐकूण तिच्या माता-पित्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात संबंधीत आरोपींवर इतर अनेक गुन्हे दाखल असून तो तडीपार असल्याची माहीती मिळाली.