सोलापूर : डाळिंबाची खाण असलेल्या सांगोला तालुक्यातील मांजरी गावात आज युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, डाळिंबावरील ‘मर’ रोगाने शेतकरी त्रस्त आहेत. निवेदनाद्वारे अनेक समस्या बळीराजा माझ्याजवळ मांडत आहेत. या शेतकऱ्यांना शिवसेनाच न्याय मिळवून देणार, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढणार असल्याचा शब्द उपस्थित शेतकऱ्यांना आदित्य ठाकरे यांनी दिला.
तत्पूर्वी सांगोला तालुक्यातील संगेवाडी येथे नुकसानग्रस्त सूर्यफूल पीकाची पहाणी केली. तहसीलदार, कृषीअधिकारी यांच्यासोबत संवाद साधून परिस्थितीचा अंदाज घेतला. अतिवृष्टीमुळे शेतातील पीक कुजून गेले आहे. अशा परिस्थितीतही शेतकरी बांधवांना मदत मिळाली नाही. येथील शेतकरी बेभरवशी सरकारमुळे पिचला गेला आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.