पंढरपूर विभागात पंढरपूर शहर, ग्रामीण १ व ग्रामीण २ मध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा तीन्ही प्रकारचे एकूण ५१ हजार ४४९ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे एकूण ३५ कोटी ९६ लाख ५७ हजार रूपयांची थकबाकी आहेत. मंगळवेढा तालुक्यात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक स्वरूपाचे १९ हजार ६६९ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे १० कोटी ८९ लाख ३९ हजार रूपयांची थकबाकी आहे. तर सांगोला विभागात या तिन्ही प्रकारच्या २६ हजार ६५२ ग्राहकांकडे १३ कोटी २ लाख १३ हजार रूपये थकबाकी आहे. अशी तिन्ही तालुक्याची मिळून ५९ कोटी ८८ लाख ९ हजार एवढी थकबाकी आहे.
कृषी विभागाची पंढरपूर तालुक्यातील ५१ हजार २४१ ग्राहकांकडे ८०८ कोटी ८८ लाख, सांगोला तालुक्यातील ३३ हजार १८९ ग्राहकांकडे ४१० कोटी तर मंगळवेढा तालुक्यातील २२ हजार ८६१ ग्राहकांकडे २९२ कोटी ४ हजार रूपये अशी १५१० कोटी ८८ लाख ४ हजार एवढी प्रचंड थकबाकी वाढली आहे. त्यामुळे वीज वितरणचे अर्थकारण पूर्णपणे बिघडले असून पंढरपूर विभागात घरगुती ५९ कोटी ८८ लाख ९ हजार व कृषी विभागाची १५१० कोटी ८८ लाख ४ हजार अशी एकूण १५७० कोटी ७६ लाख १३ हजार इतकी थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीसाठी वीज वितरणने आता धडक मोहिम सुरू केली आहे. थकीत वीजबिले न भरल्यास तत्काळ वीज तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकरी, ग्राहक व वीज वितरणचे अधिकारी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
१०० टक्के दंडव्याज, मूळ रकमेच्या ५० टक्के वीजबिले माफ
कृषी विभागाची मोठी थकबाकी वसूल करण्यासाठी वीज वितरण धडक मोहीम राबवित असून ग्राहकांना परवडतील, अशा काही योजना राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये थकीत वीजबिलावरील १०० टक्के दंडव्याज माफ केले जाणार आहे. तर थकीत वीजबिलाच्या एकूण मूळ रक्कमेवर ५० टक्के वीजबिले माफ केली जाणार आहेत. त्यामुळे उर्वरीत रक्कम भरून वीज वितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कोट ::::::::::::::::::::::::
ग्राहकांनी भरलेल्या पैशांचा सर्वस्वी मोबदला आता ग्राहकांनाच मिळणार असून वसूल रक्कमेमधील जवळपास ६६ टक्के रक्कम जिल्ह्यातच खर्च केली जाणार आहे. म्हणून वीज वितरणने ग्राहकांना घालून दिलेल्या सवलतींचा फायदा घेत ३१ मार्चपर्यंत जास्तीत जास्त ग्राहकांनी वीजबिले भरून वीज वितरणला सहकार्य करावे. याच पैशातून ग्राहकांना रोहित्रे, केबल्स व अन्य साहित्य देण्यासाठी वीज वितरण प्रयत्नशील आहे.
- हेमंत कासार
सहायक अभियंता, वीज वितरण, पंढरपूर ग्रामीण