कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने २२ ऑगस्टपर्यंत गाजरगवत जागरुकता सप्ताह राबविण्यात येत आहे. आपल्याकडे गाजरगवताला काँग्रेस गवत म्हणून ओळखले जाते. हे गवत एक वर्षाय फांद्यायुक्त रोप असून, याची उंची एक ते दीड मीटरपर्यंत वाढते. या तणाची पाने गाजरासारखी असल्याने याला गाजरगवत म्हणून ओळखतात. या गवताचे बी प्रकाशात किंवा अंधारात बी उगवू शकते. आम्लयुक्त किंवा क्षारपड जमिनीत याची उगवण क्षमता व वाढ चांगली होेते. समुद्रकिनारी, कमी पावसाच्या भागात, पाणथळ जमिनीच्या भागात मोठ्या प्रमाणात आढळून येते.
.........
गाजरगवतामुळे हे आजार होऊ शकतात
गाजरगवताच्या संपर्कामध्ये सातत्याने आल्यानंतर माणसांना त्वचारोग, ॲलर्जी, दमा, ताप, खाज हे आजार होऊ शकतात. तसेच हे गवत खाल्याने जनावरांना अनेक रोग निर्माण होतात. दुधामध्ये कडूपणा तयार होते.
........
असे करा गवताचे व्यवस्थापन
फुलोऱ्यात येण्यापूर्वी गाजरगवत काढून नष्ट करा.
घराजवळ झेंडूच्या फुलाची लागवड करावी.
शेतामध्ये ज्वारी, मका, बरूसारखे जोमाने वाढणारी पिके घ्यावीत.
पावसाळ्यात मेक्सिकन बिटल हे कीटक गवतात सोडावेत.
पडीक जमिनीवर तणनाशक औषधांची फवारणी करावी.
.............
गाजरगवत हे भारतात ३५ हजार हेक्टरावर पसरले आहे. भारताबरोबरच अमेरीका, वेस्ट इंडीज, मॅक्सिको, नेपाळ, वियतनाम आणि ऑस्ट्रेलिया देशांनाही या तणाच्या प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. बागयती क्षेत्रापेक्षा कोरडवाहू क्षेत्रावर याचा प्रसार जास्त होतो.
- डॉ. लालासाहेब तांबडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र