सोलापूर : पेट्रोल, डिझेलच्या किमतींनी शंभरी गाठली आहे. यामुळे पेट्रोल, डिझेलच महाग आहेत अशी ओरड सर्वसामान्यांमध्ये झालेली पहायला मिळत असतानाच शेवगा शेंगाच्या एक किलोसाठी पेट्रोलपेक्षा दुप्पट दर मोजावे लागत आहेत. सध्या बाजरात शेवगा शेंगाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने एक किलोसाठी दोनशे ते दोनशे वीस रुपये मोजावे लागत आहे.
सध्या बाजारात फळभाज्यांनीही शंभरी गाठलेली होती; पण मागील काही दिवसांपासून फळभाज्यांच्या दरात प्रतिकिलो वीस ते तीस रुपयांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात ६० रुपये किलो असणारी सिमला मिरची सध्या बाजारात ३० ते ५० रुपये किलो, ६० रुपये किलो असलेली हिरवी मिरची ३० रुपये किलो दराने आणि साठ रुपयाची भेंडी ५० रुपये किलो दराने विकली जात आहे. गवारचे दर अजूनही ७० ते ८० रुपये किलो आहे. याच प्रकारे दोडक्याचे आवक कमी असल्याने दोडक्याच्या दरात मात्र घसरण झाली असून सध्या दोडके ५० ते ६० रुपये किलोपर्यंत विकले जात आहेत. शेवगा शेंगाच्या दरात वाढ झाल्याने बाजरात शेंगा पाच ते दहा रुपयांना नग विकले जात आहे. अनेक भाजी मंडईंमध्ये तर शेवगा शेंगाच दिसेनासे झाले आहेत.
हरभराच्या भाजीला चांगला भाव
बाजारात नवीन हरभऱ्याची भाजी येत आहे. या भाजीला हरभरा डाळीपेक्षा दुप्पट भाव मिळत आहे. सध्या बाजारामध्ये हरभरा डाळ ७० ते ८० रुपये किलो आहे. तर हरभऱ्याची भाजी मात्र ४० रुपये ते ५० रुपये पाव किलो दराने विकली जात आहे. सोबत पावसामुळे बाजारात डाग पडलेले टोमॅटो विक्रीस आले आहेत. या डाग लागलेल्या टोमॅटोना सध्या ३० ते ४० रुपये किलो दर मिळत असून विना डागवाले टोमॅटो साठ ते ऐंशी रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे.
कोथिंबीर, पालक, शेपू स्वस्त...
पालेभाज्या स्वस्त बाजारात पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यामुळे ऐशी रुपयांपर्यंत गेलेली कोथिंबीरची पेंडी सध्या पाच ते दहा रुपयांवर आली आहे. तसेच पालक पाच रुपये, शेपू दहा रुपये दराने विकली जात आहे. तसेच कांद्याचे पात दहा रुपये पेंडी दराने विकला जात आहे.
सध्या पालेभाज्यांचे दर कमी झाल्यामुळे खर्च कमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी पालेभाज्या खरेदीसाठी दोनशे रुपये पुरत नव्हते. पण सध्याला शंभर रुपयांमध्ये पालेभाज्यांची खरेदी होत आहे.
- गृहिणी
सध्या पालेभाज्या जरी स्वस्त झाले असले तरी टोमॅटो, कांदे, गवार आदी फळभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. हे दर सर्वांना परवडणारे असायला पाहिजे. यामुळे शासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे.
- गृहिणी
राज्य शासनानेही टॅक्स कमी करावे...
दिवाळीमध्ये केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील टॅक्स कमी केल्यामुळे डिझेल आणि पेट्रोलच्या दरात पाच ते दहा रुपयांनी घसरण झाली. पण तरीही पेट्रेल अद्यापही एकशे दहा रुपये लिटर दराने मिळत आहे. यामुळे राज्य शासनानेही टॅक्स कमी करण्याची मागणी सर्व सामान्य जनतेकडून होत आहे.