सोलापूर : महसूल विभागातर्फे विविध विभागांतील रिक्त २१ जागांसाठी काढण्यात आलेल्या भरतीसाठी सात हजार अर्ज आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त अनुसूचित जमातीच्या रिक्त २१ जागांसाठी ही भरती काढण्यात आली आहे. त्यामध्ये शिपाई:२, लिपिक:४, तलाठी: १५ अशा जागांचा समावेश आहे. यात तलाठी पदासाठी बी. ई. सिव्हिल, बीएचएमएस, एम.ए. बी. एड. अशा पदवीधारकांनी अर्ज केला आहे. यामध्ये एक भाऊ इंजिनिअर तर बहीण डॉक्टर आहे.
सोलापूरबरोबरच इतर जिल्ह्यातील उमेदवारांचा यात समावेश आहे. भरतीसाठी उमेदवारांकडून दीडशे रुपयांचा डी.डी. घेण्यात आला आहे. पण भरतीच्या पुढील प्रक्रियेबाबत माहिती मिळत नसल्याने शंभराच्यावर उमेदवारांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी केली. दुपारी एक वाजेच्या सुमाराला या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमधील खांबावर डकविलेली सूचना पाहिली. पण परीक्षेचे वेळापत्रक, केंद्र आणि प्रवेशपत्र मिळाले नसल्याची त्यांची कैफियत होती. त्यामुळे या उमेदवारांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी वेबसाईटवर सर्व माहिती देण्यात येत असल्याचे स्पष्ट केल्यावर उमेदवार आल्या पावली परत निघून गेले.
रविवार, दि. १२ जानेवारी रोजी शहरातील विविध केंद्रांवर या पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या भ्रमणध्वनी मेलवर ओळखपत्रे पाठविली जाणार आहेत. परीक्षा क्रमांक व केंद्राबाबतची माहिती एसएमएस व मेलवर पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
शिक्षकांसाठी आठशे अर्ज- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील २८ रिक्त जागांबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पण नव्याने २१ जागा उपलब्ध झाल्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली. शिक्षक पदासाठी आठशे अर्ज आले आहेत. गेले तीन दिवस जिल्हाधिकारी कार्यालय व झेडपीतील प्रशासन विभाग या परीक्षेच्या तयारीत आहेत.