नासीर कबीरकरमाळा : तालुक्यात सोगाव (पू.) येथील युवा शेतकरी ब्रह्मदेव सरडे यांनी २६५ जातीच्या आडसाली उसाचे फक्त १० गुंठे क्षेत्रात तब्बल ४४ टन ऊस उत्पादन घेतले. या हिशेबाप्रमाणे विक्रमी एकरी १७६ टन ऊस उत्पादन निघाले. त्यांनी वेगवेगळ्या प्रयत्नातून हा प्रयोग यशस्वी केला आहे. भविष्यात ५ एकर क्षेत्रात हा प्रयोग करण्यात येणार आहे. उसाचे वजन कमीत कमी ३ किलो व जास्तीत जास्त ४.५ किलो अशी गुणवत्ता पाहायला मिळाली.
प्रारंभी जमिनीचे माती परीक्षण केले़ जमिनीची उभी व आडवी दीड फूट खोलीपर्यंत नांगरट केली़ रुंद सरी पद्धत अवलंबून ठिबक सिंचनाचा वापर केला़ उसावर स्प्रे, एक डोळा बेणे लागवड केली़ स्वत:च्या बेणे मळ्यातील कोवळे, जाड, रसरशीत, निरोगी बेण्यांचा वापर केला़ जैविक, सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर योग्य प्रमाणात केला़ जैविक व रासायनिक बेणे प्रक्रिया, सबसोईलरचा वापर केला.
मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सिलिकॉनचा वापर केला़ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (बु) पुणे, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, कृषी विज्ञान कें द्र, कृषी विभागमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले़ कमीत कमी खर्च करून जास्तीत-जास्त ऊस उत्पादन मिळाले़ आज एक एकरात १७६ टन ऊस निघाला आहे. यात साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
कोथिंबिरीचे आंतरपीक - आंतरपीक म्हणून कोथिंबीर हे पीक घेतले़ त्यातून २३ दिवसांत एकरी १० हजार पेंढ्या उत्पादन मिळाले़ पाच रुपये पेंढीप्रमाणे ५० हजार रुपये मिळाल़े त्या भांडवलातून खतांचा व इतर सर्व खर्च भागविला. संडे फार्मर ते विक्रमी ऊस उत्पादक शेतकरी असा त्यांचा प्रवास सुरू आहे. २०० व्हॉट्स अॅप ग्रुप, फेसबुक, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, फोन कॉलिंग, ऊसपीक चर्चासत्रे, कृषी प्रदर्शन, ऊसपीक कार्यक्रम आदींच्या माध्यमातून शेतकºयांना मोफत मार्गदर्शन करतात.
सरडे कुटुंब एक सामान्य शेतकरी कुटुंब आहे़ यापूर्वी आमच्या कुटुंबाने एकरी १५० टन ऊस उत्पादन घेतले आहे़ याची दखल घेऊन दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, गोवा, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल ३४ कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऊस शेतीतील सर्व कामे आई, स्वत: मी व पत्नीच्या मदतीने करुन घेतली़- ब्रह्मदेव सरडे, ऊस उत्पादक, सोगाव (पू)