राजकुमार सारोळे/राकेश कदम
सोलापूर : झुलवा पाळणा, पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा, पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा...महाराष्टÑात आजवर शिवप्रेमींनी अनेक सोहळे केले असतील. पण हजारो सोलापूरकर शिवभक्त महिलांनी मंगळवारी ‘न भूतो न भविष्यती’ असा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करून आपल्या लाडक्या राजाला मानवंदना दिली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात आजवर अनेक कार्यक्रम झाले. परंतु, मंगळवारी रात्री झालेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्याने नवा इतिहास घडवला. रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवभक्तांची दाटी झाली होती. पहिल्यांदाच भव्य-दिव्य पाळणा कार्यक्रम होत असल्याने प्रत्येकाच्या चेहºयावर उत्सुकता आणि आतुरता दिसत होती.
महिला पुतळ्याच्या बाजूने बसल्या होत्या. रात्री ११ नंतर महिलांची गर्दी वाढत वाढत एसटी स्टॅँडच्या पुढे गेली. रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी झाली होती. एका बाजूला महिला तर दुसºया बाजूला तरुणांची गर्दी होती. या गर्दीतून जय जिजाऊ, जय शिवरायचा जयघोष होता. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ राजमाता जिजाऊंचा पुतळा ठेवण्यात आला होता. या पुतळ्याच्या अगदी समोरच सजवून ठेवलेला पाळणा होता. त्यात बाळशिवबांची मूर्ती होती. दूरूनच या पाळण्याचे छायाचित्र टिपण्यासाठी महिलांची धडपड सुरू होती. ११.४५ वाजता वीरपत्नी, वीरमाता या पाळण्याजवळ आल्या. देशाच्या संरक्षणासाठी त्याग करणाºया या मातांचा महापौर श्रीकांचना यन्नम, सूत्रसंचालिका प्रा. ज्योती वाघमारे यांनी कृतज्ञता म्हणून सत्कार केला.
रात्री १२ वाजता ‘झुलवा पाळणा.. पाळणा बाळ शिवाजीचा’ हे पाळणा गीत सुरू झाले आणि हजारो महिला, शिवभक्तांनी जल्लोष केला. ज्या क्षणाची सर्व जण वाट पाहत होते तो पाळण्याचा कार्यक्रम सुरू झाला. जमलेल्या महिला, मुले टाळ्या वाजवीत पाळण्याच्या गीताला दाद देऊ लागली. फुले उधळू लागली. आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. ‘जय जिजाऊ-जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष गगनात दुमदुमला. हवेत भगवा झेंडा गरगर फिरला आणि पुन्हा जय शिवरायचा जयघोष झाला.
गुलाब पाकळ्यांची उधळण अन् फटाक्यांची आतषबाजी- मध्यरात्री बरोबर बारा वाजता पाळणा सुरू झाला. पाळणा झाल्याबरोबर उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव केला. हर हर महादेव, जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा सुरू झाल्या. फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश दुमदुमून गेले. डोळ्यांचे पारणे फिटणारा शिवजन्मोत्सव सोहळा पाहून अनेकांनी संयोजकांचे कौतुक केले. उपस्थितांना लाडू वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. शिवजन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून सर्वजण अत्यंत शिस्तबद्धपणे घराकडे परतले. सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांचा पोलीस बंदोबस्त होता. पण कार्यक्रमाचे नियोजन स्वयंसेवकांनी केले. अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत हा सोहळा पार पडला.
अॅम्ब्युलन्सला दिला रस्ता- सोहळा संपल्यावर शिवकन्या घराकडे जात असतानाच पुणे नाक्याकडून दोन अॅम्ब्युलन्स आल्या. सर्वांनी तत्परता दाखवत बाजूला सरकत अॅम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करून दिला. अनेकांनी आपली वाहने बाजूला केली. त्यामुळे कोणताही अडथळा न येता या अॅम्ब्युलन्स रुग्णालयात पोहोचल्या.
पाळणा सोहळा झाला यांच्या हस्ते- पाळणा सोहळा वीरपत्नी सानिया मोहसीन शेख, लक्ष्मी पवार (मंगळवेढा), शांताबाई चव्हाण (बावची, मंगळवेढा), ’-श्यामल माने (येड्राव) अलका कांबळे (मंद्रुप), सुनीता शिंदे (परंडा रोड, बार्शी), मालनबाई जगताप (कसबा पेठ, माढा), नंदा तुपसौंदर (पांढरेवस्ती, सोलापूर), हवालदार वर्षा लटके, सुरेखा पन्हाळकर (सालसे, करमाळा), सिंधू पुजारी ( होनमुर्गी, दक्षिण सोलापूर), वीरमाता वृंदादेवी गोसावी (पंढरपूर), बाई घाडगे (भोसे, मंगळवेढा), आणि महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले.
पोलिसांचा बंदोबस्त- गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मेकॅनिकी चौकात बॅरिकेडिंग करून वाहने बंद केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती बॅरिकेड्स लावण्यात आले होते, पण गर्दी वाढल्यावर हे बॅरिकेड्स काढण्यात आले. पाठीमागे असणाºयांना शिवजन्मोत्सव सोहळा दिसावा म्हणून सर्वांना खाली बसविण्यात आले. त्याचबरोबर स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी आपल्या जागी स्तब्ध बसून पाळणा कार्यक्रमाचा आनंद घेतला.