सोलापूर/ मुंबई - सांगोल्याचेआमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांनी तब्बल 11 वेळा आमदार होण्याचा विक्रमच आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे एकाच पक्षातून त्यांनी आपल्या विचारांशी ठाम राहून विधानसभा गाजवली. गणपतराव देशमुख यांच्या साधेपणाचे अनेक किस्से मीडियात रंगतात. सांगोल्याची जनता या वयोवृद्ध आमदारांवर, आपल्या लाडक्या नेत्यावर जीवापाड प्रेम करते. सांगोल्यातील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा जनतेचं हे प्रेम दिसून आलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध राज्यातील सर्वच पक्षांना लागले आहेत. त्यासाठी, उमेदवारांची चाचपणी आणि पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, आपल्या वयाचे आणि प्रकृतीचे कारण देत सांगोल्यातून यंदा मी निवडणूक लढवणार नाही, असे सांगोल्याचे विक्रमादित्य आमदार गणपतराव देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा गणपतराव देशमुख यांनाच उमेदवारी घेण्याचा आग्रह केला आहे. विशेष म्हणजे सभेच्या ठिकाणी शेकापच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी करत गणपतराव देशमुख यांच्या पायावरच डोकं ठेवलं. आबा, काहीही झालं तरी यंदाही तुम्हीच निवडणूक लढवा असं म्हणत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनी भावुक केललं हे वातावरण पाहून गणपतराव देशमुखही गहिरवले होते. मात्र, मला शेकापला सांगोल्यात जिवंत ठेवायचं आहे. त्यामुळे, मी हयात असेपर्यंत शेकापचाच दुसरा आमदार सांगोल्यातून निवडूण आणायचाय, असे देशमुख यांनी म्हटले.
विधानसभा निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून निश्चित निवडून येईन पण माझ्या माघारी शेकापचे भवितव्य काय? भविष्यात शेकापचे तत्त्वज्ञान तालुक्यात टिकले पाहिजे. यासाठी मी ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याकडे पाच नावे आली आहेत मी व शेकापचे सर्व पदाधिकारी याबाबत लवकरच निर्णय घेऊ. या निवडणुकीत मी उमेदवार नसलो तरी जो उमेदवार आपण देणार आहोत त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यादृष्टीने आजपासून कामाला लागावे, असे आमदार गणपतराव देशमुख यांनी केले. यावेळी त्यांनी सरकारी धोरणांवर टीका केली. तसेच, या निवडणुकीत उभा राहत नसलो तरी राजकारण व समाजकारण सोडणार नाही .माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे .तालुक्यातील शेकापच्या उमेदवारीचा निर्णय पक्षाचे राज्य सरचिटणीस जयंतराव पाटील व मी स्वतः पक्षाचे कार्यकर्त्य घेणार आहेत