सोलापूर : रेल्वेत चोरी करणाऱ्या अट्टल चोराने झटपट पैसे कमवण्यासाठी घराजवळील सहा वर्षांच्या यश दीपक कोळी याला ऊस देतो असे सांगून अपहरण केले. मुलाला सोडून देण्यासाठी आरोपीने पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी यशच्या वडिलांना चोरीच्या मोबाईलवरून फोन केल्यामुळे आरोपी सागर कृष्णप्पा गायकवाड (वय २६, रा. महालिंगेश्वर नगर, बसवेश्वर नगरजवळ, होटगी रोड) याला अटक केली.
सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोपी सागर गायकवाड याने यशचे अपहरण करून त्याला आपल्या औराद येथील आजीकडे ठेवले. त्यानंतर सागर हा पुन्हा आपल्या घरी आला. दरम्यान, यशचे वडील हे मुलाला शोधत होते. त्याचवेळी आरोपीने फोन करून पैशांची मागणी केली. तेव्हा दीपक यांनी विजापूर नाका पोलिसांना ही माहिती दिली. माहिती कळताच पोलिसांनी रात्री दीपक यास आलेल्या फोन नंबरवरून त्या मोबाईलचे ट्रेसिंग केले. तेव्हा फोन हा तेथील गावातीलच टॉवर एरियामधून येत असल्याची माहिती कळाली. पोलिसांनी त्या परिसरातील प्रत्येक घरांची झडती घेतली. आरोपीचे घरही तेथेच होते. आरोपी हा पोलिसांसमोर निर्धास्त फिरत होता. संशयावरून पोलिसांनी आरोपी सागर याला ताब्यात घेतले. पहिल्यांदा त्याने उडवा- उडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर मुलाला ठेवल्याची माहिती दिली. ही माहिती कळताच पोलिसांनी आरोपीसोबत घेऊन जाऊन मुलाला ताब्यात घेतले.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक उदयकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, राजकुमार तोळणुरे, शावरसिद्ध नरोटे, श्रीरंग खांडेकर, सचिन सुरवसे, आयाज बागलकोटे, प्रकाश निकम, इम्रान जमादार, पिंटू जाधव, विशाल बोराडे, लक्ष्मण वसेकर, बालाजी जाधव, उदयसिंह साळुंखे, रमेश सोनटक्के, राेहन ढावरे यांनी ही कामगिरी केली.
आई-वडिलांना आनंदाश्रू
यशच्या अपहरणानंतर तो रडू लागला़ यामुळे त्याला खेळण्यासाठी मोबाईल दिल्यानंतर तो शांत बसला होता. अपहरणानंतर त्याला जेव्हा मंगळवारी आई-वडिलांकडे सोपवण्यात आल्यावर त्या दोघांनी यशला आपल्या कुशीत घेतले. मुलगा मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. दोघांनीही पोलिसांचे आभार मानले.