मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
अपहरण घटनेबाबत माहिती समजताचमंगळवेढा पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करून अपहरणकर्तेबाबत माहिती कळविताच दोन तासाच्या आत अपहरणकर्तेना चारचाकी गाडीसह जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान एसपी तेजस्विनी सातपुते यांच्या संकल्पनेतुन बसविण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सतर्कतेने अपहरणाचा प्रकार उघडकीस आला आहे. सांगोला तालुक्याच्या ग्रामीण भागातुन एका व्यक्तीस चारचाकी गाडीतून अपहरणाची घटना घडली. या घटनेबाबत पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांना माहिती समजताच त्यांनी तात्काळ अपहरणकर्त्यांच्या बलेनो कार विषयी माहिती व वर्णन ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे 18002703600 या क्रमांकावर परिसरातील नागरिकांना दिली. सदरचा कॉल मंगळवेढा व सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांच्या तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर प्रसारित झाला.
दरम्यान पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे हे आपल्या सहकाऱ्यांसह मिळालेल्या माहितीनुसार मंगळवेढावरून सांगोला तालुक्याच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी या मार्गाकडे जाणाऱ्या काही नागरिकानी हा संदेश ऐकला आणि संदेशात ऐकल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वर्णनाची कार भिकारअकोले या गावाजवळ नागरिकांनी रस्त्यावर येऊन अडवण्याचा प्रयत्न केल्याने अपहरणकर्ते जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलीस दलास यश आले. या कारमध्ये तिघेजण होते यातील एकजण पळून गेला होता. त्याला दामाजी चौकात पकडण्यात आले. दरम्यान एसपी तेजस्विनी सातपुते यांच्या संकल्पनेतुन काही दिवसांपूर्वी मंगळवेढा तालुक्यात सदर अत्याधुनिक ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तासाच्या आत अपहरणकर्तेना जेरबंद करण्यात मंगळवेढा व सांगोला पोलिसांना यश आले आहे.