सोलापूर : सोलापूर शहरातील विडी घरकुल येथील पिण्याच्या पाईपलाईनमधून चक्क १९ फुट वडाच्या पारंब्या महापालिकेच्या अधिकाºयांनी बाहेर काढल्या आहेत़ या परिसरातील नळाला पाणी का येत नाही याची तपासणी केल्यावर पाईपलाइन शेजारी ३५ फुटावर असलेल्या वडाच्या झाडाच्या मुळ्या पाईपलाइन मध्ये घुसल्याचे दिसून आले आहे़ २० वर्षापुर्वीची ही पाईपलाइन असून आतमध्ये वाढलेल्या वडाच्या पारंब्या बाहेर ओढून काढण्यासाठी जीप गाडीचा वापर करण्यात आला
प्रभाग १0 ब च्या नगरसेविका सावित्रा सामल (रा. बी ग्रुप, विडी घरकूल) यांच्या घरामागील काही लोकांना बºयाच दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी येत होते. तक्रारी करूनही महापालिकेच्या अधिकाºयांनी दखल घेतली नव्हती. अलीकडे तर अर्धा तासाला घागरभर पाणी मिळू लागल्याने नागरिक हैराण झाले.
समोरील घरांना भरपूर पाणी पण शेवटच्या चार-पाच घरांना थेंब थेंब पाणी येत होते. त्यामुळे येथील नागरिकांनी विभागीय अधिकारी मठपती यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यावर मठपती यांनी जलवाहिनी तपासण्यासाठी मजूर पाठविले. मजुरांनी संबंधिताच्या घराजवळची जलवाहिनी तपासली. त्यावेळी शेवटच्या काही भागात जलवाहिनीत पाणी येत नसल्याचे आढळले. जलवाहिनीत काहीतरी अडकल्याचा अंदाज मजुरांनी केला. जलवाहिनी फोडून नुकसान करण्यापेक्षा शेवटची कॅप उघडण्याची मठपती यांनी मजुरांना सूचना केली. कॅप उघडल्यावर त्यांना आत मुळ्या भरल्याचे दिसून आले. बाजूला ३५ फुटांवर असलेल्या वडाची झाडाची मुळी कॅपमधून जलवाहिनीत शिरली होती. या मुळीने आता जाळे निर्माण केले होते. तारेने टोकरून जाळे काढण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. शेवटी आत तार घुसवून जीपने ओढण्यात आले. रॉड घालून परिसरातील लोकांनी एकजूट करून ओढले. त्यावेळी १९ फुटाच्या वडाच्या पारंब्या बाहेर निघाल्या. विडी घरकूल आणि पूर्व भागात दिवसभर या घटनेची चर्चा होती.