पंढरपूर : पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अभिजीत पाटील यांचे तर उपाध्यक्षपदी प्रेमलता रोंगे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
कारखान्याच्या नूतन संचालकांची आज कारखाना कार्यस्थळावर निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी अभिजीत पाटील यांची तर उपाध्यक्षपदी प्रेमलता रोंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या ४५ वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहिला उपाध्यक्ष मान मिळाला.
विठ्ठल कारखान्याच्या चाव्या तिसऱ्यांदा पाटलाच्या हाती
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची स्थापना तत्कालीन चेअरमन कर्मवीर कै. औदुंबरअण्णा पाटील यांनी केली आहे. औदुंबरअण्णा पाटील यांच्या कारकिर्दीचे, उत्कृष्ट कारभाराचे आजही राज्यभर दाखले दिले जातात. त्यांच्यानंतर कै. राजाभाऊ पाटील, कै. वसंतदादा काळे, कै. भारत भालके आणि भगीरथ भालके यांनी कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहिले.
मागील चार वर्षांपासून कारखान्यावर अधिक कर्जांचा डोंगर झाला. यामुळे अनेक शेतकरी संघटना, सभासदांनी आंदोलन केले. यामुळे जशी अण्णांची कारकिर्द उत्कृष्ट कारभार म्हणून ओळखली जात होती. त्याप्रमाणे भालके यांची कारकिर्द आंदोलने गाजली आहेत. परंतु मागील १५ दिवसांत झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत भालके गटाचा पराभव करत अभिजीत पाटील यांनी विजय मिळवला. कारखान्याचे चेअरमन होणारे तिसरे पाटील आहेत. यामुळे हे पाटील कारखान्याला डबघाईतून वर काढतील, कारखाना बंद पाडतील की, सुरू करतील. सभासद, ठेकेदारांची देणी देतील का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.