राकेश कदम
सोलापूर : शहरात कोरोनाचे बळी वाढत आहेत. गेल्या चार महिन्यात मरण पावलेल्या व्यक्तींपैकी ४५ टक्के व्यक्ती अखेरच्या दोन-तीन दिवसांपूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मृतांमध्ये ६० वर्षांवरील ६५.९५ टक्के व्यक्तींचा समावेश असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
शहरात १२ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर दर महिन्याला बाधितांची आणि मृतांची संख्या वाढत आहे. शहरातील स्थिती काळजी करण्यासारखी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आरोग्य विभागातील लोक व्यक्त करीत आहेत.
यादरम्यान, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरातील कोरोनाबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. यात रुग्णांचे वयोमान, मृत्यूदर आणि बाधितांची वर्गवारी करण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणे दिसलेले लोक उपचारासाठी उशिरा दाखल होतात.
ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर उपचारासाठी दाखल केले जात नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. शहरात २० जुलैअखेर ३७६२ रुग्ण आढळून आले. यात ३१ ते ५० वयोगटातील रुग्णांचा टक्का ३२.५९ तर ६० वर्षांवरील व्यक्तींचा टक्का २०.३९ टक्के आहे. मृतांमध्ये शून्य ते १५ वयोगटातील एकही नाही. ६० वर्षांवरील ६५.९५ टक्के तर ५१ ते ६० वयोगटातील २२.३९ टक्के व्यक्ती आहेत.
मरण पावलेल्यांमध्ये १९.६३ टक्के लोक हे २४ तासांपूर्वी रुग्णालयात दाखल झाले. १३.८० टक्के लोक हे २४ ते ४८ तासांपूर्वी, ११.६५ टक्के लोक हे ४८ ते ७२ तासांपूर्वी तर २६.६८ टक्के लोक हे तीन ते सात दिवसांपूर्वी दाखल झाले आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सात दिवसांपेक्षा अधिक दिवस उपचार करूनही २८.२२ टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे.
बाधित रुग्णांचे वयोमानवय टक्केवारी
- ० ते १५ ८.५१
- १६ ते ३० २१.५६
- ३१ ते ५० ३२.५९
- ५१ ते ६० १६.९६
- ६० वर्षांवरील
- २०.३९
मृत्यूचे प्रमाणवयोगट टक्केवारी
- ० ते १५ ०
- १५ ते ३० १.५३
- ३१ ते ५० १०.१२
- ५१ ते ६० २२.३९
- ६० वर्षांवरील ६५.९५