लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : विवाहानंतर वर्षभरातच विविध मागण्या करीत त्याची पूर्तता होत नसल्याने घरकाम येत नसल्याचे कारण पुढे करीत बार्शीत माहेरी आलेल्या एका विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सोलापुरातील तक्रार निवारण कक्षाच्या आदेशाअंती नगरमधील माय लेकाविरुद्ध बार्शीतील पोलिसांनी छळाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अमृता सूरज कदम (२६, रा. पांडुरंग नगर, निंबळक, ता. जि. अहमदनगर) हिने बार्शी पोलिसांत फिर्याद दिली आहे. १७ मे २०२० राेजी अमृताचा विवाह निंबळक येथील सूरज कदम यांच्याशी झाला. त्या सध्या सावळे गल्ली बार्शी येथे सासरी राहतात. पोलिसांनी सासू कल्पना दिलीप कदम, पती सूरज दिलीप कदम (दोघे रा. पांडुरंगनगर निंबळक, ता. जिल्हा नगर) व नणंद पूजा जीवन सावंत (रा. पाटस, जि. पुणे) यांच्याविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना काळात विवाह लावताना गावच्या सरपंचाच्या पतीने कन्यादान केले होते. विवाह झाल्यानंतर सासरच्या लोकांनी लग्नात संसारोपयोगी साहित्य दिले नाही, माहेरी धोंडा महिन्यात कपडे व एक तोळे सोने घालण्यासाठी तगादा लावला. सासरच्या लोकांकडून इच्छा पूर्ण केली जात नसल्याने पती आणि सासूने तिला जामखेड येथे आत्याच्या घरी सोडले. या त्रासास कंटाळून तिने सोलापूर महिला निवारण कक्षाकडे तक्रार नोंदवली. कक्षातील अधिकाऱ्यांनी त्यांना बोलावूनही चौकशीला गैरहजर राहिले. यानंतर महिला तक्रार निवारण कक्षांनेच पोलिसांत तक्रार देण्याचे विवाहितेला पत्र दिले. अधिक तपास फौजदार कर्णेवाड करीत आहेत.