सोलापूर : शिधापत्रिकावरील नाव कमी करून तक्रारदाराचे नाव लावण्यासाठी ३०० रूपयाची लाच स्वीकारताना दक्षिण सोलापूर तहसिल कार्यालयातील लिपीकास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
मळसिध्द बिराप्पा जडगे (वय ३१ रा. चिंचपूर ता़ दक्षिण सोलापूर) असे लाच स्वीकारणाºया लिपीकाचे नाव आहे. तक्रारदार यांचे वडीलांचे नावे रेशनकार्ड असून ते मयत झाल्याने रेशनकार्डवरील वडीलांचे नाव कमी करून तक्रारदाराच्या नावाची नोंद करण्यासाठी तक्रारदाराने सेतु कार्यालयात अर्ज केला होता़ सदर काम लिपीक मळसिध्द जडगे याच्याकडे प्रलंबित होते़ शिधापत्रिकेवरील वडीलांचे नाव कमी करून तक्रारदाराचे नाव लावण्यासाठी लिपीक जडगे यांनी तक्रारदाराकडे ३०० रूपयाची लाचेची मागणी केली होती़ ही रक्कम दक्षिण तहसिल कार्यालयात लिपीक जडगे स्वत: स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडली.
ही कारवाई पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर, पोनि भोपळे, सहा़ फौजदार जाधवर, पोह पवार, पोलीस शिपाई देशमुख, जानराव यांच्या पथकाने केली़ पुढील तपास पोलीस निरीक्षक कविता मुसळे या करीत आहेत.