सोलापूर : खरेदी केलेल्या मालमत्तेवर तक्रारदाराचे नाव लावून तशी कर पावती देण्यासाठी दोन हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती दीड हजार रूपयाची लाच स्वीकारताना सोलापूर महानगरपालिकेतील कर निरीक्षकास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
प्र्रकाश स्वामी मरेड्डी (वय ५४ कर निरीक्षक वर्ग ३, शहर हद्दवाढ विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर) असे लाच स्वीकारणाºया अधिकाºयाचे नाव आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेवर तक्रारदाराचे नाव लावून तशी कर पावती देण्यासाठी कर निरीक्षक प्रकाश मरेड्डी यांनी दोन हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दीड हजाराची लाच स्वीकारताना मरेड्डी यास शहर हद्दवाढ विभागाच्या कर संकलन विभागाच्या कार्यालयात रंगेहाथ सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अरूण देवकर, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, कविता मुसळे, सहाय्यक फौजदार निलकंठ जाधवर, पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पवार, पोलीस शिपाई निलेश शिरूर, पोलीस शिपाई सिध्दाराम देशमुख, शाम सुरवसे यांनी पार पाडली. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे हे करीत आहेत.