सोलापूर : तुळजापूरहून ज्योत घेऊन सोलापूरकडे येत असताना दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात तीन तरुण जखमी झाल्याची घटना रविवार १५ ऑक्टाेबर रोजी पहाटे साडेचार वाजता सोलापूर-तुळजापूर रोडवरील माळुंब्रा गावाजवळ घडली. तर दुसऱ्या अन् तिसऱ्या घटनेत तिघे तरूण जखमी झाले आहेत.
महेश शिवाजी ईश्वरकट्टी (वय ३४, रा. शांती नगर, मजरेवाडी, सोलापूर), दीपक गणेश तळे (वय २२, कुमार गल्ली, उत्तर सदर बझार, सोलापूर) अशी जखमी दोघांची नावे आहेत. महेश व दीपक हे दोघे नवरात्रोत्सवानिमित्त रविवार १५ ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन ज्योत आणत होते. रविवारी पहाटे साडेचार वाजता दुचाकीवरून सोलापूरकडे येत असताना माळुंब्रा गावाजवळ दुचाकी स्लीप होऊन पडल्याने त्यात दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर तुळजापूर येथील रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी दत्तात्रय यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालय, सोलापूर येथे दाखल केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. दोघांच्या हाता, पायास व डोक्यास मार लागला आहे. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून दोघेही शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अंजनगांव, मंगळवेढ्यातील तरूणांचा समावेश
दुसऱ्या घटनेत राजकुमार संतोष सुतार व राजकुमार भिमराव पवार (वय १४, रा. अंजनगांव खेड, ता. माढा), सुरज भिमराव पवार (वय १९) हे दोघे अंजनगांव ते तुळजापूरकडे ज्योत आणण्यासाठी जात असताना उजकाईच्या अलीकडे खांबाला धडकून पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना सुजित पवार याने उपचारासाठी शासकीय रूग्णालयात आणले. तिसर्या घटनेत सोहेल समीर मुल्ला (वय १८, रा. कोळेगाव, मंगळवेढा) हा सोलापूर ते तुळजापूर ज्योत आणण्यासाठी जात असताना तामलवाडी टोलनाक्याजवळ दुचाकी स्लीप होवून पडल्याने जखमी झाला. मित्र सार्थक याने उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले.