सांगोला : भरधाव कारवरील चालक पतीचा ताबा सुटून कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात माय - लेक मरण पावले तर सोपान निकते हे जखमी झाले. त्याच्यावर पंढरपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सांगोला-पंढरपूर रोडवरील मेथवडे फाट्याजवळील धोकादायक वळणावर घडला.अस्लेशा सोपान निकते (वय २९) व आरव सोपान निकते (वय ४, रा. फत्तेपूरनगर-पंढरपूर) असे अपघातात ठार झालेल्या माय-लेकराचे नाव आहे.
फत्तेपूरनगर-पंढरपूर येथील सोपान नारायण निकते, पत्नी अस्लेशा व मुलगा आरव हे १४ मार्च रोजी (क्र. एम.एच.१३/बी.एन.८५१८) कारमधून पत्नी अस्लेशाच्या इचलकरंजी येथील भगिनी मयुरीच्या घरी कौटुंबिक कार्यक्रम असल्याने गेले होते.
दोन दिवसांच्या पाहुणचारानंतर निकते कुटुंब शनिवारी रात्री ७.३० च्या सुमारास सांगोल्यात आले होते. कुटुंबातील वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून परतीला निघाले असताना मार्गात ही दुर्घटना घडली. या दूर्घटनेबद्दल पंढरपुरात हळहळ व्यक्त होत आहे.
वाढदिवसाचा आनंद दु:खात लोटला- अस्लेशा निकते यांचे वडील दिलीप पतंगे यांचा वाढदिवस असल्याने जावई सोपान निकते, मुलगी अस्लेशा व नातू आरव यांनी पतंगे कुटुंबीयांसमवेत दिलीप पतंगे यांचा वाढदिवस साजरा केला. जेवणानंतर निकते कुटुंब त्यांच्या कारमधून पंढरपूरकडे प्रवासाला निघाले. त्यांची कार मेथवडे फाट्याजवळील धोकादायक वळणावर आली असता सोपान निकते यांचा कारवरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला चारीत आदळून पलटी झाली. अपघातानंतर जखमी अवस्थेत सोपान निकते यांनी अपघाताची माहिती सासरे दिलीप पतंगे यांना मोबाईलवरून दिल्यानंतर पतंगे कुटुंबीयांना धक्काच बसला.