सोलापूर : दुचाकीवरुन गावाकडे ट्रिपलसीट निघालेली दुचाकी हायवेवर चालवत असताना अचानक टायर फुटले अन् दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर कोसळले. यामध्ये वृद्धेसह तिघेजण जखमी झाले. बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडी-बोरामणी गावाच्या मध्ये पेट्रोलपंपाजवळ हा अपघात झाला.
या अपघातामध्ये लक्ष्मी बिराप्पा सौदागर (वय- ६०), बाळू बिरप्पा सौदागर (वय- ३७), मुक्ताबाई बाळू सौदागर (वय- १५, रा. निलेगाव, ता. तुळज़ापूर) या बापलेक व आई जखमी झाले. त्यांना डोक्यास, हातास, पायाला खरचटले आहे. १५ वर्षाच्या मुक्ताबाई या मुलीला गंभीर दुखापत झाली आहे.
यातील बाळू बिरप्पा सौदागर हे बुधवारी सकाळी आसरा चौकातील हरिश्वरा रेसिडेन्सी येथून निलेगाव या राहत्या गावी दुचाकीवरुन ट्रिपलसीट निघाले होते. तांदुळवाडी आणि बोरामणी गावाच्या मध्ये असलेल्या रोडवर पेट्रोलपंपाजवळ दुचाकीचे टायर अचानक फुटले आणि दुचाकीवरील तिघेही रोडवरत कोसळले.
यात तिघांनाही गंभीर दुखापत झाली. अपघाताचे वृत्त कळताच महेश बनसोडे याने सर्वांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.