सोलापूर : सर्वांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवणाºया हुजेल सिराज मनियार (वय २७, रा़ पंचशील नगर, कुमठा नाका) याचा अपघाती मृत्यूही टिपला गेला कॅमेºयात. यामुळे मनियार कुटुंबीय बेसहारा झाले असून जुळी मुलेही अनाथ झाली आहेत़ यामुळे कुमठा नाका परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुसºयांची संपत्ती सुरक्षित रहावी यासाठी धडपड करून सीसीटीव्ही बसवण्याचे काम हुजेल हा गेल्या अनेक वर्षांपासून करत होता़ गुरुवारी सकाळी हुलेज हा नमाज पठण केल्यानंतर तो आपल्या चुलत भावाच्या नई जिंदगी येथील दुकानी जाऊन बसला़ नंतर तो दुकान आपले उघडण्यासाठी दुचाकीवरून जात असताना ट्रकला ओव्हरटेक करुन समोरून येणाºया रिक्षाचा कट लागल्यामुळे तो ट्रकच्या खाली गेला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तेथील नागरिकांनी लगेचच त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले़ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापर्यंत तो शुद्धीवर होता़, नंतर मात्र त्याची तब्येत खालावली आणि तो मरण पावला. कुमठा नाका येथील अंत्रोळीकरनगर येथे जाणाºया रस्त्याजवळ गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला, अशी माहिती चुलत भाऊ खालीद मनियार याने दिली़ हुजेलचा अपघात चौकातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
हुजेल हा पंचशील नगरमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता़ हुजेलचा ८ मे २०१७ रोजी विवाह झाला होता़ नऊ महिन्यापूर्वी म्हणजे मार्च २०१९ मध्ये दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता़ यात एक मुलगा आणि एक मुलगी होती़ हुजेलचा मृत्यू झाल्याची माहिती परिसरात कळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती़ दरम्यान, ट्रक चालक हा घटनेनंतर पुढे निघून गेला होता़ पण पोलिसांच्या सहाय्याने ट्रकच्या मालकाचा शोध लावला असून ट्रक सध्या हैदराबादमध्ये असल्याची माहिती ट्रक मालकाने दिली अशी माहिती खालीद याने दिली़ घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाली आहे.
७ वर्षांपूर्वी मुलगी गेली आता मुलगाही गेला..- हुजेल हा आपल्या आई-वडिलांसमवेत कुमठा नाका येथे राहत होता़ हुजेलचे कुटुंब त्याच्या उत्पन्नावरच चालत होते़ सात वर्षांपूर्वी हुजेलच्या छोटी बहिणीचाही मृत्यू झाला होता़ यानंतर हुजेलचा मृत्यू झाला आहे़ यामुळे हुजेलचे कुटुंबीय बेसहारा झाले आहे़