सोलापूर - बार्शी तालुक्यातील उक्कडगावचे सुपुत्र आणि भारतीय नौदल सेवेत कार्यरत असलेले जवान अनिल सुनिल सानप यांचे अपघाती निधन झाले. पुणे-मुंबई एक्सप्रवेस महामार्गावरुन ते प्रवास करत असलेल्या खासगी वाहतुकीच्या एर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये, त्यांचे दुर्दैवी निधन झाले. ते ३० वर्षांचे होते. या घटनेनं गावावर शोककळा पसरली असून बार्शीसह मित्रपरिवारानेही शोक व्यक्त केला. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी मूळ गावी उक्कडगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी आणि ५ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
अनिल सानप हे वडिलांच्या वैद्यकीय उपचारावरील विमा कागदपत्रांची फाईल जमा करण्यासाठी गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी मुंबईहून पुण्याला आले होते. मात्र, पुण्याहून परत जाताना ते प्रवास करत असलेल्या गाडीचा अपघात होऊन त्यांचे दुर्दैवी निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचा अपघात झाला होता. तेव्हा, त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. त्यावेळी, सुनिल हे मुंबईतून येऊन वडिलांची काळजी घेत. दुर्दैवाने वडिलांच्या विमा अपघाताची कागदपत्रे देण्यासाठी आल्यानंतर अपघातातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. उमेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी नौदल जवानांचे पथक आज उक्कडगाव येथे आले होते. तसेच, बार्शीचे तहसिलदार आणि अनिल यांचा मित्र परिवारही जमला होता. मानवंदना देत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावार अंत्यसंस्कार करण्यात आले.
शालेय व माध्यमिक शिक्षण बार्शीतच
अनिल सानप यांचे प्राथमिक शिक्षण पांगरीत झाले असून खामगांव येथील आश्रम शाळेत त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले होते, त्यानंतर, श्रीमान झाडबुके महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. दरम्यान, सन २०११ मध्ये ते भारतीय नौदलात भरती झाले होते. गेल्या १० वर्षांपासून ते भारतीय नौदलाच्या सेवेत कार्यरत होते.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील उतारावर किमी 37 जवळ गुरुवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. एक महिला या अपघातात सुदैवाने वाचली आहे. या मृत्युमुखी पडलेल्या ५ जणांमध्ये उमेश सानप हे नौदलातील जवान होते.