सोलापूर : पाण्याच्या शोधासाठी रस्ता ओलांडून जात असताना उदमांजराचा अपघात झाला. वाहनाने धडक दिल्याने झालेल्या या अपघातात उदमांजराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बंकलगी - जवळगी रस्त्यात झाला.
बंकलगी आणि जवळगी या दरम्यान असललेल्या रस्त्याच्या बाजूला वन्यजीवांचा अधिवास आहे. पाणी पिण्यासाठी या रस्त्यावरुन वन्यजीव जात असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठा खड्डा आहे. प्राणी हा खड्डा ओलांडून थेट रस्त्यावर येतो. त्यांना वाहनाचा अंदाज येत नाही. वाहन चालकांना देखील वन्यजीव रस्त्यात येत असल्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होतात. उदमांजराचा अपघात हा यामुळेच झाला असावा. त्याच्या तोंडाला जोराचा मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, असे प्राणिमित्र सामाजीक बहुद्देशीय संस्था मल्लिकार्जुन धुळखेडे यांनी सांगितले.
या रस्त्यावर आत्तापर्यंत साळिंदर, काळवीट, ससा तसेच उदमांजर यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात स्थानिक शेतकऱ्यांनी माती व मुरुम टाकला, त्यामुळे अपघाताची संख्या कमी झाली. मात्र, माती व मुरुम कमी असल्याने अजूनही अपघात होत आहेत. याठिकाणी माती, मुरुम टाकून तो खड्डा पूर्ण भरावा अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी वन विभागाकडे केली.