सोलापूर : ट्रायच्या निर्णयानुसार येत्या १ फेब्रुवारीपासून टीव्ही आणि मोबाईलवरील सर्वच चॅनल्सचे प्रसारण बंद पडणार आहे. ट्रायच्या धोरणाविरोधात आमचा लढा आहे. यात ग्राहकांनी साथ द्यावी, असे आवाहन लोकमतच्या व्यासपीठावरुन चर्चासत्रादरम्यान शहरातील केबल आॅपरेटर्सनी केले, तर उत्तम सेवा देण्याची अपेक्षा ग्राहक वर्गाने व्यक्त केली.
मोबाईलवर दिसणारे टीव्ही चॅनल्सचे प्रसारणही १ फेब्रुवारीपासून बंद पडणार आहे. कारण प्रत्येक मोबाईलमध्ये आयपी पॅड असतो. हा आयपीटीव्ही अॅप बंद पडणार असल्याने प्रसारण मोबाईलवरून पाहता येणार नाही. मोबाईलवरील चार अॅप्स पे होणार आहेत. त्याचा भुर्दंडही मोबाईल ग्राहकांना बसणार आहे.
मात्र ग्राहकांना १३० रुपये भरून प्रसार भारतीच्या डिशवर एचडी चॅनल्स पाहता येणार आहेत, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. १ फेब्रुवारीपासून ट्रायचा नवा नियम लागू होत आहे. पॅकेजच्या निवडीसाठी केबल ग्राहकांना २६ जानेवारीपर्यंत संधी आहे. त्यानंतर १ फेबु्रवारीपासून पॅकेज न घेणाºया सर्वच ग्राहकांकडील प्रसारण सेवा आपोआपच ठप्प होणार आहे.
ग्राहकांचा चॉईस महत्त्वाचा असे सांगितले जात असताना येथे मात्र वेगळाच प्रकार आहे. हॉटेलमध्ये थाळी मागवल्यावर त्यातील पदार्थ कमी करून थाळीची किंमत वाढविण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली.