सोलापूर: मोहोळ शौचालय घोटाळ्याचा प्राथमिक चौकशी अहवाल सीईओंना (मुख्य कार्यकारी अधिकारी) सादर झाला असून, लेखा शाखा व मास्टर मार्इंड ‘टीम हजरत’ दोषी असल्याचे म्हटले आहे. बँकांच्या असहकार्यामुळे गैरप्रकार झालेल्या रकमेचा स्पष्ट आकडा अंतिम झालेला नसल्याचे सांगण्यात आले. मोहोळ तालुक्यातील निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याची तक्रार आली होती. त्याची चौकशी जिल्हा परिषद-ग्रामपंचायत विभागाच्या संलग्न कार्यालयाच्या पथकाने केली. एप्रिल महिन्यात चौकशीला सुरुवात झाली होती. त्याची चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नाही. झालेल्या चौकशीच्या आधारे ग्रामपंचायत विभागाने सीईओंना अहवाल सादर केला असल्याचे सांगण्यात आले. मोहोळ पंचायत समितीमधील लेखा शाखेला प्रमुख जबाबदार धरण्यात आले आहे. प्रस्तावांची तपासणी न करता शौचालय बांधण्याचे धनादेश दिले आहेत. याशिवाय दिलेल्या धनादेशाप्रमाणे बँकेत संबंधितांच्या नावावर धनादेश जमा दाखवत नाही, परंतु पैसे मात्र खर्ची पडले आहेत. त्यामुळे लेखा शाखेवर ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय या घोटाळ्याला स्वच्छतादूत मास्टर मार्इंड हजरत शेख व त्याची टीमही कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
-----------------------------
जिल्हा परिषदेमध्ये ‘लुटो... बाँटो..’
मोठ्या रकमेच्या व जनतेच्या नावावर पैसे उचलणार्या या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन दक्ष नसल्यानेच एक महिन्यातही तपास पूर्ण झाला नाही. जिल्हा परिषदेचा एकूणच कारभार लुटो..बाँटो.. असाच सुरू असून सर्वात ढिसाळ कारभार सुरू आहे. कोणाचे कोणावर नियंत्रण नाही व कोणीच कोणाचा आढावा घेत नसल्याने ज्यांच्या-त्यांच्या मर्जीनुसार जि.प.चा कारभार सुरू आहे.
---------------------
असा झाला गैरव्यवहार
मागील वर्षी अनुदान उचललेले २३०० पैकी ५६७ प्रस्ताव दुबार आढळले. ही रक्कम गैरप्रकारात धरली. उचललेले धनादेश बँकेत जमा दिसत नाहीत लेखा शाखेने लाभार्थींच्या नावे धनादेश काढण्याऐवजी ग्रामपंचायतीच्या नावे धनादेश काढले वटलेल्या धनादेश लाभार्थींची यादी देण्यासाठी २० बँकांना पत्र दिले परंतु जिल्हा बँक कामती, वैनगंगा कृष्णा कामती, देना बँक अनगर व एस.बी.आय. नरखेड या चारच बँकांनी याद्या दिल्या. स्वच्छतादूत हजरत शेख याला बँकेतून पैसे काढून दिल्याचे लेखी जबाब अनेकांनी दिले आहेत.