सोलापूर: मोहोळ तालुक्यातील शौचालय अनुदान घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आला असून, घोटाळा करण्यासाठी पंचायत समितीच्या लेखा विभागाचा मोठा हातभार असल्याचे स्पष्ट होते. घोटाळा करणार्याने सर्वांना सोबत घेण्याची चलाखी केल्याचे तपासणी समोर आले आहे. निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामाच्या अनुदान वाटपात मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याने चौकशी सुरू आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने एम.आर.ई.जी.एस. तसेच निर्मल भारत अभियानाचे कर्मचारी तपासणीसाठी नियुक्त केले आहेत. मागील आठवड्यापासून तपासणी सुरू असून या आठवड्यात तपासणी पूर्ण होईल असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी सांगितले. पोखरापूर, सय्यद वरवडे, मोहोळ शहर व अन्य काही गावात एकच व्यक्ती व एकाच कुटुंबाच्या नावावर अनेकवेळा धनादेश काढल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१३-१४ या वर्षात मोहोळ तालुक्यात २३९४ लाभार्र्थींना शौचालय बांधल्याचे धनादेश दिले आहेत. शौचालय अनुदानासाठी सरपंच व ग्रामसेवकांच्या संयुक्त सहीचा प्रस्ताव येतो, त्यावर अभियंत्याची सही असते, विस्तार अधिकार्याच्या तपासणीनंतर पंचायत समितीच्या लेखा विभागाने तयार केलेल्या ‘क्रॉसचेक’ वर गटविकास अधिकार्याची सही होते. तपासणीत शौचालयाचे प्रस्तावच सापडत नाहीत. याशिवाय बेअरर धनादेश दिल्याचेही स्पष्ट होते.
------------------------
२४ वेळा लाभ
पोखरापूर येथील ग्रामरोजगार सेवक नामदेव काळे यांच्या कुटुंबाच्या नावे २४ वेळा धनादेश काढल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. काळे यांनी दिलेल्या जबाबात घोटाळ्याचा प्रमुख हजरत शेख याला बोगस धनादेशाची दोन लाख ८० हजार ६०० रुपये रक्कम दिल्याचे म्हटले आहे. स्वत:कडे असलेले ५० हजार रुपये भरण्यास तयार असल्याचे काळे यांनी लिहून दिले आहे.
-------------------------------------
५६९ जणांना दुबार लाभ
आतापर्यंतच्या तपासणीत शौचालयाचे ५६९ लाभार्र्थींना दुबार लाभ दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोहोळ शहरातील संतोष गोरख कोकाटे यांच्या नावाने पाच वेळा तर आई छाया गोरख कोकाटे यांच्या नावे दोन वेळा अनुदानाचे धनादेश काढले आहेत. यातील रक्कम हजरतला दिली असल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे.