कुर्डूवाडी : सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांसह सर्व खात्यांच्या कर्मचाऱ्यांची पेन्शन डिसेंबर महिना संपत आला तरी जमा झाले नव्हते. त्यामुळे काही सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षकांनी नुकताच झालेला पेन्शनर डेवरही बहिष्कार टाकला. ते कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. याबाबत त्यांच्या व्यथा ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्यातील ४ हजार २५५ सेवानिवृत्त शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन कोषागार विभागाने प्रत्येक तालुक्याच्या संबंधित कार्यालयात मंगळवारी दुपारी जमा केले आहे.
तालुकास्तरावरील कार्यालयातून आता प्रत्येकाच्या बँक खात्यात रकमा जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सेवानिवृत्तिधारकांना येत्या दोन दिवसांत पेन्शन मिळणार आहे. अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहे.
आपले सेवा निवृत्तिवेतन जमा होईना म्हणून सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी हे प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र संताप व्यक्त करीत होते. त्यामुळे त्यांनी १७ डिसेंबरच्या पेन्शन डेलाही कुठेही हजेरी लावली नव्हती. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपली पेन्शन कधी होतेय म्हणून आजही प्रत्यक्षात वाट पहावी लागत असल्याची खंत ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे ना.पा. कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठांनी केली होती. त्याबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध करताच सोलापूरचे कोषागार विभाग खडबडून जागा झाला व अधिकाऱ्यांनी लागलीच शासनाकडून आलेली पेन्शन तालुकास्तरावरील कार्यालयाकडे जमा केली. त्यामुळे तेत्या दोन दिवसांत प्रत्येकाच्या खात्यावर निवृत्तिवेतन वर्ग होतील, असे तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोट ::::::::
जिल्ह्यातील २ हजार २०२ शिक्षकांचे पेन्शन अनुदान सर्व तालुक्यांच्या बँक खात्यात कोषागार विभागाने जमा केलेले आहे. तसेच २ हजार ५३ इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचेही पेन्शन अनुदान शासनाकडून उपलब्ध झालेले आहे. त्याबाबतची देयकेही कोषागार कार्यालयात सादर झालेली आहेत. त्यामुळे दोन दिवसांत सगळ्यांना आपली पेन्शन मिळणार आहे. हे केवळ ‘लोकमत’ने आपल्या बातमीतून आवाज उठविल्याने शक्य झाले.
- ना. पा. कुलकर्णी,
जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक, कुर्डूवाडी