पोलीस सूत्रांनुसार, कमी किमतीत डिजे, साऊंड आणि ॲम्लिफायर मशीन विकायचे आहे असे संदेश व पोस्ट टाकून फिर्यादीस मोबाईलवरून संपर्क साधून सचिन काळे व इतर काहीजण बोलावून घेत असत. त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील दोन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतल्याचा गुन्हा नोंद होता. यापूर्वीही अशी लूटमार केल्याचे गुन्हे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मोक्का कायद्यान्वये गुन्ह्यात अकरा संशयित आरोपी असून, त्यामध्ये दहाजणांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून दोन वर्षांहून अधिक काळ फरार असलेला सचिन किरण काळे (वय ३०) हा पुळूज येथे लपून बसल्याची खबर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना मिळाली होती. त्यांनी पथक पुळूज बंधाऱ्याकडे रवाना केले.
पथकातील पोलिसांना काळे काटेरी झुडपात लपून बसल्याचे दिसून आला. त्याला गराडा घालून पकडण्याचा प्रयत्न केला. पळून जाताना पाठलाग करून जेरबंद केले. काळे याच्यावर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल असून, तो सराईत गुन्हेगार आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात, नीलेश रोंगे, पोलीस नाईक चंदनशिवे, पोलीस हवालदार आतार, राहुल लोंढे यांनी केली.
----