सांगोला : सातारा जिल्ह्यात कोरेगाव येथे तीन वर्षांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणातील एका आरोपीला सांगोल्यात गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाने पकडले.
संतोष होबू राठोड मूळगाव (रा. कुंडल पोस्ट शावळ ता. अक्कलकोट जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो तीन वर्षांपासून चिणके (ता. सांगोला) येथे कुटुंबासह राहत होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.
पोलीस उपनिरीक्षक प्रताप वसगडे, दत्ता वजाळे, सचिन देशमुख, राहुल देशमुख, बाबासाहेब पाटील, धनंजय इरकर हे गस्त घालत नाझरामठ येथे आले. त्यादरम्यान या ठिकाणी काही लोकांमध्ये भांडण चालू होते. गस्तीवरचे पोलीस पथक तेथे पोहोचले. त्यांनी संतोष राठोड याची चौकशी करता स्वत:ची माहिती द्यायला तो टाळाटाळ करीत होता. पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याच्या मूळ गावाकडे चौकशी केली आणि वस्तुस्थिती पुढे आली. त्याच्यासोबत त्याची बहीण लक्ष्मी संतोष चव्हाण (रा. कोरेगाव, जि. सातारा) देखील राहत असल्याचे समजले. पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आली. या घटनेनंतर तो तीन वर्षांपासून फरार होता. सांगोला पोलिसांनी कोरेगाव पोलीस स्टेशनशी संपर्क करून खात्री केली असता संतोष राठोड संबंधित गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असल्याची माहिती हाती आली. रात्री उशिरापर्यंत कोरेगाव पोलिसांचे एक पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी सांगोल्याला निघाल्याचे पोलिसांनी सांगितले.
----
फोटो - २२ संतोष राठोड