करमाळा : शहरातील सुमंतनगर भागात १७ जुलैच्या रात्री ९ वाजता झालेल्या खुनी हल्ल्यातील आरोपीस अखेर पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश शिवरात्रे यांनी २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
राजेंद्र ऊर्फ सोमनाथ विठ्ठल कांबळे (रा. सुमंतनगर, करमाळा) हे १७ जुलैला रात्री स्वतःच्या घरात टी.व्ही. पाहात बसले होते. रोहित राहुल मुळूक (रा.चांदगुडेगल्ली, करमाळा) हा तेथे आला. त्यांने हातातील राजेंद्रवर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी रोहित मुळूक याचेविरुध्द खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप करीत आहेत.
घटनेनंतर संशयित आरोपींने तेथून पळ काढला होता. पोलिसांनी आरोपीच्या मोबाइल लोकेशनवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा मोबाइल बंद होता. पोलिसांनी आरोपीच्या नातेवाइकांची माहिती घेऊन शोध सुरू केला. अखेर पाचव्या दिवशी संशयित हा तालुक्यातील ग्रामीण भागात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. २२ जुलैला रात्री ८ वाजता त्याला शोधून काढून अटक केली. त्यानंतर रोहित मुळूक यास न्यायालयात न्यायाधीश शिवरात्रे यांच्या समोर हजर केले असता, त्यास २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.