सोलापूर : पाच खून करुन आजन्म कारावासाची शिक्षा शाबीत झालेला व शिक्षेपासून मागील २० वर्षापासून अस्तित्व लपवून राहणारा आरोपी जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. जाफर बाळु पवार (वय ६०, रा. सिध्दापुर ता. मंगळवेढा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी जाफर पवार याने दोन महिला व तीन मुलांची हत्या केली होती. या गुन्हयात सत्र न्यायालय सोलापूरने जाफर यास आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालय मुंबई येथे सदर शिक्षेविरोधात अपिल केले होते. दरम्यान, उच्च न्यायालय मुंबई यांनी अपील फेटाळले होते तेव्हापासून आरोपी मिळुन येत नव्हता. न्यायालयानेही आरोपीस पकडण्यासाठी अटक वॉरंट काढले होते. त्यानंतर गुन्हयाची तीव्रता लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी संंबंधित आरोपीास पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोउपनि सुबोध जमदाडे यांचे पथकाने ५ जून २०२३ रोजी सिध्दापूर (ता. मंगळवेढा) येथे सापळा रचून आरोपीचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले.आरोपीस सत्र न्यायालय सोलापूर यांचे न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने आरोपीस आजन्म कारवासाची शिक्षा भोगण्याकरिता कारागृहात रवानगी केली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोउपनि सुबोध जमदाडे, श्रेणी पोसई राजेश गायकवाड, सपोफौ श्रीकांत गायकवाड, सपोफौ शिवाजी घोळवे, पोहवा परशुराम शिंदे, सलीम बागवान, हरिदास पांढरे, आबासाहेब मुंढे, पोना रवी माने, मपोना ज्योती काळे, पोकॉ अजय वाघमारे, समर्थ गाजरे, सुरज रामगुडे, यश देवकते, चापोहवा प्रमोद माने, चापोशि दिलीप थोरात यांनी केली.