करमाळा : निमगाव (टें) ता. माढा येथील मतदान केंद्रावर पोलिंग एजंट देण्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी आपल्याला शिवीगाळ केली. आमदार बबनराव शिंदे यांनी अरेरावी केली, असा आरोप प्रहार संघटनेचे कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी केली.
खुपसे म्हणाले, निमगाव टें येथील मतदान केंद्रावर भाजपच्या कार्यकर्त्यानी एक पोलिंग एजंट दिला होता. या पोलिंग एजंटला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हरकत घेतली. त्याबाबत मी मतदान केंद्राध्यक्षसोबत चर्चा करीत असताना संजय शिंदे तेथे आले. त्यांनी मला शिवीगाळ केली. तिथं जवळच असलेले आमदार बबनराव शिंदे यांनीही ‘याला हाकलून द्या रे’, असे ओरडून सांगितले. त्यामुळे पोलिस मला घेऊन टेंभुर्णी पोलिस ठाण्यात आले.
यानंतर आम्ही तहसीलदारांकडे गेलो. त्यांनी पोलिंग एजंट चालतो, असे सांगितल्यानंतर आम्ही सर्वजण पुन्हा निमगावच्या मतदान केंद्रावर गेलो. तिथे रवींद्र शिंदे याने आमच्या पोलिंग एजंटला हाकलून दिले. त्यामुळे आम्ही रवींद्र शिंदे यांच्या विरोधात तक्रार द्यायला टेंभुर्णी पोलिसांत गेलो. पराभव समोर दिसत असल्याने संजय शिंदे आणि त्याचे लोक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दादागिरी करीत आहेत, असा आरोपही खुपसे यांनी केला.