पोलीस सूत्रांनुसार निर्मला लक्ष्मण चौगुले (रा. खडकपूर, मोडनिंब ता. माढा) ही महिला देवडी पाटी येथील सार्थकराज हॉटेल येथे काम करते. या हॉटेलमध्ये चार महिन्यांपूर्वी देवराज ऊर्फ कृष्णराज पाटील याने चहा पिण्यासाठी आल्यावर त्या महिलेची ओळख करून घेतली. ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातूनच मला पैशांची गरज आहे, असे म्हणत देवराज याने संबंधित महिला निर्मलाकडून १ लाख ३० हजार रुपये
घेतले होते. ते उसने घेतलेले पैसे त्या महिलेने परत मागितले होते. ते पैसे तुला देतो म्हणून देवराजने ६ सप्टेंबर रोजी त्या महिलेस कारमधून भांबेवाडी गावाच्या परिसरात निर्जन ठिकाणी नेले. तेथे धारदार हत्याराने निर्मला चौगुलेंवर हल्ला करून रस्त्यावरच टाकून पळून गेला होता. याप्रकरणी त्या महिलेच्या फिर्यादीनुसार देवराज बेडगे याच्या विरोधात ७ सप्टेंबर रोजी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदला होता.
----
भोयरेत सापळा रचून केली अटक
या गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. सहायक पोलीस निरीक्षक सुधीर खारगे यांना हा आरोपी भोयरे येथे येणार असल्याची खबर मिळाल्याने त्याला सापळा रचून गुन्हे शाखेचे हवालदार शरद ढावरे, गणेश दळवी, पांडुरंग जगताप, हरिदास थोरात यांनी त्याला गुन्ह्यात वापरलेल्या कारसह ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे करीत आहेत.
----