माढा पोलिसांना धक्काबुक्की करून तहसील आवारात असणाऱ्या सबजेलमधून सोमवारी सकाळी चौघे पळून गेले होते. यातील आकाश उर्फ अक्षय रॉकी भालेराव याला माढ्याजवळील महातपूरच्या हद्दीतील उसाच्या फडातून अटक केली. चिखलामुळे निर्माण झालेल्या त्याच्या पाऊलखुणावरून माढा पोलिसांनी त्याला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. दुसरा पोस्को गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असणारा आरोपी तानाजी नागनाथ लोकरे यालाही मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर पकडले. तो पुण्याला जाण्याच्या तयारीत होता. ही कारवाई कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, हवालदार नितीन गोरे, पोलीस दत्ता सोमवाड, सिद्धनाथ वल्टे यांच्या पथकाने केली.
आरोपी तानाजी लोकरे हा कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातीलच पोस्को गुन्ह्यातील आरोपी आहे. माढा सबजेलमधून इतरांच्या साथीने प्लॅन करून पळाल्यानंतर पुन्हा कुर्डूवाडी पोलिसांच्याच ताब्यात आला. त्याला माढा पोलिसांकडे सोपविण्यात आले. त्याला माढा न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.
सबजेलमधून पळालेल्या चार आरोपीपैंकी आतापर्यंत आकाश उर्फ अक्षय भालेराव व तानाजी लोकरे या दोघांना २४ तासात माढा व कुर्डूवाडी पोलिसांच्या पथकाने अटक केली. उर्वरित गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपी अकबर सिद्दाप्पा पवार व सिद्धेश्वर शिवाजी केचे हे अद्यापही हाती लागलेले नाहीत.
-----
नेमणूक चौघांची जागेवर एकटाच
माढा सबजेलमध्ये सोमवारी सकाळी दप्तरी नोंदीनुसार सहायक फौजदार पठाण, पोलीस कर्मचारी सुधीर पवार, शहाजी डुकरे व चौधरी हे चार पोलीस कर्मचारी नेमणुकीस होते. घटना घडली त्यावेळी मात्र फक्त शहाजी डुकरे हे एकटेच तिथे उपस्थित होते. त्यांनाच एका आरोपीने झटका आल्याचा बहाणा करीत दवाखान्यात नेण्यासाठी दरवाजा उघडण्यास सांगितले. आणि दरवाजा उघडताच त्यांच्याशी झटापट करीत सर्वजण पळून जाण्यात यशस्वी झाले.
----
तिघे कोठे? अहवाल एसपींकडे
त्यामुळे वरिष्ठांची परवानगी नसताना व इतर साथीदार जागेवर उपस्थित नसताना जेलचा दरवाजा कसा काय उघडण्यात आला. यामुळेच चार आरोपी पळून गेले अशी चर्चा पोलिसांत दुसऱ्या दिवशीही दिवसभर होती. नेमणुकीस असलेले तिघे पोलीस कोठे होते याचा अहवाल लवकरच पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात येईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई होईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
----
200721\img-20210720-wa0335.jpg
माढा सबजेलमधून पळालेला आरोपी कुर्डूवाडी पोलिसांकडून अटक फोटो