शहर व तालुक्यातील नागरिकांना कोरोनाला रोखण्यासाठी विनाकारण घराबाहेर फिरू नका, असे आवाहनही करमाळा पोलिसांनी केले होते. तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार व पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या कारवाई सुरू आहे. यासाठी करमाळ्यात चार पथके तयार केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून शहरात विनाकारण फिरणारे, दुचाकीवर फिरणारे व मेडिकलची खोटी कारणे सांगणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.
सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा, या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार फौजदारी प्रक्रिया दंड संहिता कलम १४४ नुसार आदेश दिला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करण्यासाठी व नाक्यानाक्यावर थांबून कारवाई सुरू आहे. नागरिकांनी मास्क वापरावे, विनाकारण घराबाहेर फिरू नये, सॅनिटायझरचा वापर करावा व गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी केले आहे.