सोलापूर - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी(AIMIM Asaduddin Owaisi) मंगळवारी सोलापूरमध्ये पक्षाच्या कार्यक्रमात आले होते. पण, यादरम्यान त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली. ओवेसी आलेल्या लॅन्डरोव्हर, वाहन क्रमांक टीएस-११ / ईव्ही-९९२२ या वाहनांवर पुढील बाजूस नंबरप्लेट नव्हती. त्यामुळे, सदर चारचाकी वाहनावर केंद्रीय मोटार वाहन कायदयानुसार सीएमव्हीआर कलम 50/177 अन्वये कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावला होता.
खासदार असदुद्दीन औवेसी यांचा सोलापूरातील कार्यक्रमासाठी येतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते नंबर प्लेट नसलेल्या वाहनात दिसत आहेत. मात्र, यावेळी मास्क घालायला ते विसरले नाहीत, गाडीतून उतरण्यापूर्वी मास्क घातलेले दिसत आहेत. पण, त्यांच्या ज्या गाडीतून प्रवास केला त्या गाडीला नंबर प्लेट नसल्याने वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित गाडी चालकावर कारवाई करत 200 रुपयांचा दंड ठोठावला. पोलीस निरिक्षक वाबळे यांचे समवेत सपोनि चिंतांकिदी आणि हवालदार सिरसाट यांनी निपक्षपातीपणे ही कामगिरी केली. त्यांच्या या चांगल्या कामगिरीबद्दल सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी चिंताकिंदी यांना रोख 5 हजार रुपयांचे बक्षीस मंजूर करुन गौरव केला.
दरम्यान, महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला महापालिका निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर असुदुद्दीन औवेसी हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी, औवेसींनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरही जबरी टीका केली. तसेच, शिवसेना हा धर्मनिरपेक्ष पक्ष नसल्याचेही त्यांनी म्हटले.
मुंबईत रॅलीची परवानगी नाही
एमआयएम महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढवण्याचा विचार करत असून असदुद्दीन औवेसी निवडणुकीची तयारी करत आहेत. यासाठी ते राज्यातील विविध शहरांत फिरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली होती, त्यानंतर आज सोलापूरमध्ये आले. पण, औवेसींना कोरोना महामारीमुळे मुंबईत रॅलीची परवानगी मिळालेली नाही. औवेसी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे एका सभेला संबोधित करणार होते, तरीही त्यांना प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नाही.