आप्पासाहेब पाटील
सोलापूर : थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्याची मोहीम महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशीच्या कारवाईनंतर आज दुसर्या दिवशीही कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. पेठनिहाय टॉप टेन १० थकबाकीदारांवर कारवाई करण्यात ये आहे. पहिल्या दिवशी कर संकलन विभागाच्या पथकाने सावित्रीबाई शिक्षण प्रसारक मंडळ, सिंहगड कॉलेज, केगाव (एमबीए विभाग), श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण मंडळ, एस. एस. नवले, बाळे व भारतरत्न इंदिरा कॉलेज, केगाव या तीन मोठ्या शिक्षण संस्थांच्या इमारती सील केल्याची माहिती उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली.
महापालिकेचा मालमत्ता कर न भरणाऱ्या खासगी शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था थेट सील करण्याचे आदेश महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कारवाईला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून मालमत्ता कर भरण्यासाठी सोलापूरकरांना वारंवार विनंती, आवाहन, नोटीस पाठविण्यात येत आहे. तरीही नागरिक प्रतिसाद देत नसल्याने महापालिकेने आता वसुलीसाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, नागरिकांच्या मागणीनुसार ८० टक्के शास्ती माफ होणाऱ्या अभय योजनेलाही १५ डिसेंबरपर्यंत महापालिकेने मुदतवाढ देऊनही सोलापूरकर त्यांचा फायदा घेत नसल्याचे दिसून येत असल्याने महापालिकेने मोठी कारवाईची मोहीम हाती घेतली.
दरम्यान, जप्तीच्या कारवाईच्या धास्तीने महापालिकेच्या तिजोरीत १२ थकबाकीदारांनी १ कोटी ८९ लाख ३५ हजार ८६४ रुपयांचा भरणा केला. यात सोनाशंकर ज्ञान विकास ट्रस्ट, मुरारजी पेठ (४५ लाख), मोगलय्या स्वामी-जवळेकर, ओम डेव्हलपर्स (११ लाख ३७ हजार ८०२), यशोधरा हॉस्पिटल, सिद्धेश्वर पेठ (२० लाख २८ हजार ७०४), भद्रावती यंत्रमाग संस्था, एमआयडीसी (३ लाख ८९ हजार), सत्यविजय मंगल कार्यालय, एमआयडीसी (९ लाख ३५ हजार २५७), आर. डी. सारडा, पाच्छा पेठ (४ लाख ४३ हजार ५६७), बी. एस. कामुनी, पाच्छा पेठ (४ लाख ५३ हजार ३५३), डी. एस. जाधव, पाच्छा पेठ (२ लाख २९ हजार ८९१), पुलगम टेक्सटाईल्स (१ लाख १२ हजार ५०४), मागलय्या स्वामी, सोरेगाव (११ लाख ८९ हजार १२), महाराष्ट्रा सॉ मिल (३ लाख १३ हजार ७०६), कृष्णा स्टोन (४ लाख २ हजार ३५१) भरले आहेत.