शहरातील दैनंदिन बाजारातील देवाण-घेवाण पाहता प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १५ एप्रिलपर्यंत बाजारपेठेची वेळ ही सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी होती. याबाबत नगरपरिषदेने सर्वांना विविध माध्यमातून सुचित केले होते.
मात्र, शहरात २ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेनंतर मुख्यधिकारी एन. के. पाटील आणि इतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता तब्बल ३८ दुकाने आदेशाचा भंग करून सुरू असल्याचे आढळले. या सर्व ३८ दुकानांची यादी पत्त्यासह पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना दिली. या सर्व दुकानमालकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. नगर परिषदेने केलेल्या धडक कारवाईमुळे शहरातील व्यापारी बांधवांचे धाबे दणाणले आहेत.
कोरोना टेस्टचा रिपोर्ट दुकानातच ठेवा
मोहोळ शहरासह तालुक्यात वाढती रुग्णसंख्या पाहता सर्व व्यापाऱ्यांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. टेस्ट केलेले रिपोर्ट दुकानात ठेवूनच दुकान चालू ठेवावे अन्यथा दुकानावर ही कारवाई करण्यात येईल, अशा सूचना मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दिल्या आहेत.