सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान डबलसीट प्रवास करणाºया मोटरसायकलस्वारावर कारवाई केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी नर्स पत्नीला सोडण्यासाठी जाणाºया पतीवर कारवाई झाली; मात्र कारवाई करणारे पोलिसच जर नियम तोडत असतील तर त्यांना सूट का? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडत आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशावरून सोलापूर शहरात दि. २३ मार्चपासून संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. तब्बल तीन महिन्यानंतर संचारबंदी शिथिल करण्यात आली, मात्र शहरवासीयांना नियम घालून देण्यात आले आहेत. शहरात वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. दुचाकीवरून फक्त एक व्यक्ती, रिक्षातून २ व एक चालक, मोटार कारमध्येही चालकासह दोन तर मोठ्या कारमधून चार लोकांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आदेशानुसार सध्या नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी केली जात आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे, सदर बझार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगर वस्ती पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे या सात पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शहरात प्रवेश करणाºया मार्गांवर विशेष नाकाबंदी लावण्यात आली आहे. शिवाय शहरातील मुख्य चौक असलेल्या सात रस्ता व अन्य ठिकाणीही नाकाबंदी केली जात आहे. २९ जून रोजी सकाळच्या सुमारास सात रस्ता येथे नर्स पत्नीला हॉस्पिटलला सोडण्यासाठी जाणाºया पतीवर डबलसीटची कारवाई करण्यात आली होती. आठ दिवसातील दुसºया कारवाईमुळे नर्सच्या पतीने दररोज पत्नीला कामाला सोडण्यासाठी व आणण्यासाठी जावे लागते. त्यामुळे परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज पोलीस आयुक्तालयात देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र नियमाने अशी परवानगी देता येत नसल्याचे आयुक्तालयात सांगण्यात आल्यामुळे नर्सचे पती निराश होऊन घरी परतले.
एकीकडे डबलसीटची कारवाई केली जात असताना जे कर्मचारी नाकाबंदी दरम्यान वाहने अडवतात व कारवाई करतात तेच आपली ड्यूटी झाल्यानंतर मोटरसायकलवरून डबलसीट निघून जातात. तर बहुतांश पोलीस कर्मचारी शहरात डबलसीट फिरताना दिसतात. कारवाई करणाºया पोलिसांकडूनच फिजिकल डिस्टन्सचा नियम मोडताना सर्रासपणे दिसते. हा प्रकार पाहून सर्वसामान्य प्रवाशांना प्रश्न पडतो की जो नियम आम्हाला लागू करण्यात आला आहे, तो या पोलीस कर्मचाºयांना नाही का?
अंमलबजावणी करणाºयांनीही नियम पाळावेतनाकाबंदी दरम्यान डबलसीटवर कारवाई केली जाते. वास्तविक पाहता पुरुष आणि स्त्री असेल तर ते पती-पत्नी, भाऊ-बहीण, आई-मुलगा असे कोणीही असू शकतात. शेवटी हे लोक एकाच घरातील असतात त्यांना अडवून कारवाई करणे कितपत योग्य आहे. शासनाचा आदेश आहे तर मग त्याची अंमलबजावणी करणाºया पोलिसांनी स्वत: प्रथमत: नियमाचे पालन केले पाहिजे, असे मत शहरातील प्रवासी नागरिकांनी ‘लोकमत’समोर मांडले.
पोलीस आयुक्तांनी याकडेही लक्ष द्यावे
- - सध्या नाकाबंदी दरम्यान नियमानुसार वाहन चालकावर कारवाईचे सत्र सुरू आहे.
- - जे पोलीस कर्मचारी कारवाई करतात त्यांनी स्वत: नियम तोडला तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. पोलीस आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा दंड झालेल्या प्रवासी नागरिकांमधून होत आहे.