करमाळा : सीना-कोळगाव धरणातील पाण्याचा बेकायदेशीरपणे उपसा करणाºया शेतीपंपांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या जलसंपदा, महावितरण व पोलीस यांच्या संयुक्त पथकावर गौंडरे (ता. करमाळा) येथे शेतकºयांनी दगडफेक केल्याने पथकातील दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन शेतकºयांच्या विरोधात करमाळा पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.
जलसंपदा, महावितरण कंपनी व पोलीस कर्मचाºयांच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करीत सीना-कोळगाव परिसरातील रोसा, डोमगाव, सोनारी परिसरातील २० शेतीपंपांचे शुक्रवारी वायर, पाईप, केबल साहित्य जप्त केले. दुसºया दिवशी शनिवारी दुपारी व रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास रोसा, डोमगाव (ता. परंडा), गौंडरे, आवाटी, निमगाव (ता. करमाळा) परिसरात कारवाई सुरू असताना गौंडरे येथील शिवारात अंधाराचा फायदा घेत काही शेतकºयांनी कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकातील जलसंपदा उपविभागाचे शाखा अभियंता सुनील पाटील, एस. जी. क्षीरसागर, एस. एस. सोनुने, आर. आर. माळी, महावितरणचे गणेश लोहार, पोलीस हवालदार बी. बी. जगताप, सहदेव चव्हाण, गोरख विधाते यांच्यावर तुफान दगडफेक केली. यामध्ये दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसात जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मनोज कुलकर्णी यांच्या आदेशान्वये शाखा अभियंता सुनील पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी नाना अंबारे व समाधान अंबारे (रा. गौंडरे, ता. करमाळा) या दोन शेतकºयांविरोधात करमाळा पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. सीना-कोळगाव धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला असून, धरण परिसरातील शेतकºयांनी राखीव पाण्याचा बेकायदेशीर उपसा करू नये, अन्यथा धडक कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अभियंता मनोज कुलकर्णी यांनी सांगितले.
जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला न जुमानता पाणी उपसा सुरूच- सरलेल्या मान्सूनमध्ये अत्यल्प पाऊस पडल्याने यंदा लघु व मध्यम प्रकल्पात पाणीसाठा झालेला नाही. ते कोरडे पडलेले आहेत. तालुक्यातील सीना-कोळगाव प्रकल्पात सध्या २३ दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा शिल्लक असून, या प्रकल्पातून परंडा शहरासह परिसरातील गावांना पिण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये पिण्यासाठी प्रकल्पातील पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान, प्रकल्पाच्या परिसरातील शेतकरी बेसुमार पाणी उपसा करीत असल्याचे परंड्याचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सीना-कोळगाव परिसरात शेतीपंपाद्वारे प्रकल्पातून बेसुमार पाणी उपसा होत असल्याचे जलसंपदा उपविभागीय कार्यालयास निदर्शनास आणून दिले.