सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथील भानुदास तांड्यावर धाड टाकून हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारा १ लाख ३0 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंटू काळू चव्हाण, सोमनाथ बाबू चव्हाण (दोघे रा. भानुदास तांडा, दक्षिण सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत हे पथका समवेत मुळेगाव तांडा परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यांना भानुदास तांडा येथे हातभट्टी दारू तयार होत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तांड्यावर छापा मारला असता, दोन इसम हातात काठ्या घेऊन बॅरेलमध्ये ढवळताना दिसले.
पोलिसांना पाहताच दोघे पळून गेले. जमिनीत खड्डा मारून १४ बॅरल व त्यात गूळ मिश्रीत रसायन भरलेले होते. खड्ड्यालगत चुलीवर १४ लोखंडी बॅरल असे एकूण २८ बॅरलमध्ये प्रत्येकी २00 लिटर रसायन आढळून आले. हे सर्व रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सावंत, सहायक फौजदार विवेक सांजेकर, पोलीस हवालदार मल्लिनाथ चडचणकर, सर्जेराव बोबडे, विजयकुमार भरले, पोलीस नाईक निशांत ठोकळे, पोलीस कॉन्स्टेबल आसिफ शेख, अजय वाघमारे, सचिन गायकवाड, अमोल जाधव, दीपक जाधव यांनी पार पाडली.