मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा : सहकार विभागाने मंगळवेढा तालुक्यातील ८३ सहकारी दूध उत्पादक संस्था अवसायनात काढल्या आहे. तालुक्यातील सहकारी संस्था, तसेच दूध उत्पादन संस्था मिळून तब्बल १५३ संस्थांना कायमस्वरूपी टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे.सहकार शुद्धीकरणाचा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला हा प्रयत्न बऱ्याच अंशी यशस्वी होत असून, आता सहकार खात्यात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कागदोपत्री संस्था कमी झाल्याने त्यांचे रेकॉर्ड ठेवण्याचा त्रास कमी होणार आहे.
सहकार विभागाने तालुक्यातील ८३ सहकारी दूध उत्पादक संस्था अवसायनात काढल्या आहेत. या संस्थांचे पत्ते, ऑनलाइन नोंदणी, लेखा परीक्षण, निवडणूक व अन्य मुद्यांच्या अनुषंगाने सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) ए ए गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी केली. या तपासणीनंतर तब्बल ८३ संस्था अवसायनात काढल्या आहेत.
दूध उत्पादक संस्था ग्रामीण भागातील दूध व्यवसायाचा पाया आहे. गावातील दूध उत्पादकांचे दूध जिल्हा सहकारी संघापर्यंत पोहोचणे व संघाकडून मिळणारा मोबदला, सोयीसुविधा दूध उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यात यांची मध्यस्थाची भूमिका आहे. त्यांच्या जोरावरच जिल्हा दूध संघाची भरभराट झाली होती. गावांचे राजकारणही या संस्थांभोवती फिरत होते. अनेक संस्थांनी गावाची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र गेल्या काही वर्षात जिल्हा दूध संघात सुरू झालेल्या अंतर्गत राजकारणामुळे सहकाराची घडी विस्कटली. यापूर्वीच्या सरकारने पिशवीतल्या सहकारी संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार निष्क्रिय संस्था बंद करण्याची कार्यवाही सहकार विभागाकडून सुरू आहे.
दरम्यान, तालुक्यातील सहकारी दूध उत्पादक संस्था अवसायानात काढल्या आहेत. त्यांना अंतरिम नोटिसा बजावल्या होत्या. त्यात संस्थांचे दप्तर तपासणीसह अन्य मुद्यांच्या अनुषंगाने सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) ए ए गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी केली. या तपासणीनंतर तब्बल ८३ संस्था अवसायनात काढल्या आहेत.
गृहनिर्माण, पतसंस्थासह ७०
सहकारी संस्थां अवसायनात
मंगळवेढा तालुक्यात ४१० सहकारी संस्था कार्यरत होत्या यामध्ये गृहनिर्माण संस्था, नागरी व ग्रामीण पतसंस्था, शेती पतपुरवठा संस्था, पाणीपुरवठा व पाणीवाटप संस्था,ग्राहक संस्था, नोकरदार पतपुरवठा संस्था, मजूर संस्था, फळे-भाजीपाला प्रक्रिया संस्थांसह अन्य प्रिमायसेस संस्थांचा समावेश आहे. यामध्ये केवळ कागदोपत्री असलेल्या सहकारी संस्था कायमस्वरूपी बंद करण्यासाठी सहायक निबंधक प्रमोद दुरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा परीक्षण खात्याद्वारे सर्व्हेक्षण केले. सहकार खात्याकडे नोंद असलेल्या प्रत्येक संस्थेचा ठावठिकाणा शोधला गेला. संबंधित संस्थांचे पदाधिकारी व प्रवर्तकांशी पत्रव्यवहार केला गेला, सभासदांना शोधले गेले. अशा शोधमोहिमेतूनही ज्यांच्याकडे त्यांच्या संस्थांविषयीची परिपूर्ण माहिती नव्हती, तसेच ज्या संस्था सहकार खात्याशी ऑनलाइन जोडल्या गेलेल्या नव्हत्या, ज्या त्यांच्या पत्त्यांवर सापडल्या नाहीत, तसेच ज्या संस्थांचे ताळेबंद ऑनलाइन नोंदले गेलेले नाहीत, अशा ७० संस्था मार्चअखेर अवसायनात काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यामुळे सध्या तालुक्यात ३६० सहकारी संस्था कार्यरत असल्याची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सचिन जाधव यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.