सोलापूर : ग्रामीण पोलिसांच्या वतीने विशेष पथकाने आॅक्टोबर व नोव्हेंबरदरम्यान जिल्ह्यातील दारू, जुगार, मटका व वाळू आदी अवैध व्यवसायांवर धाडी टाकून १६३ आरोपींविरूद्ध कारवाई केली आहे. या कारवाईत ४ कोटी ४४ लाख १0 हजार २९४ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आॅक्टोबर व नोव्हेंबर २0१८ दरम्यान सर्व तालुक्यातील अवैध धंद्यांविरूद्ध कारवाई सुरू करण्यात आली होती. अवैध दारू विक्री प्रकरणी बार्शी तालुक्यात २, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत १, कुर्डूवाडी-२, सोलापूर तालुका पोलीस ठाणे-२, टेंभुर्णी-२, कामती-१, माळशिरस-१ अशा एकूण ११ कारवाया करण्यात आल्या.
मटका व जुगार प्रकरणी तालुका पोलीस-१, मंद्रुप-१, बार्शी शहर-२, मोहोळ-१, वैराग-१. अवैध जुगार प्रकरणी अक्कलकोट उत्तर-२, सोलापूर तालुका-२, नातेपुते-२, टेंभुर्णी-१, वैराग-१. अवैध वाळू उपसा व विक्री प्रकरणी टेंभुर्णी-१, सोलापूर तालुका पोलीस ठाणे-१, माढा-१, अक्कलकोट दक्षिण-२, पांगरी-१, पंढरपूर तालुका-१, वळसंग-१ अशा कारवाया करण्यात आल्या आहेत.
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेगाव येथे तहसीलदार अक्कलकोट यांना भीमा नदी पात्रात अवैध उपसा करणारी बोट नष्ट करण्यास मदत केली आहे. कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेगमपूर येथील अवैध ओव्हरलोड वाहतुकीचा १ ट्रक व २ टिपर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
...तर पोलिसांना कळवा- जिल्ह्यात कोठेही अवैध धंदे सुरू असल्याची माहिती असल्यास ती तत्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.