सोलापूर : स्मार्ट सिटीचे तत्कालीन सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी स्मार्ट सिटीच्या कामात अनियमितता केल्याची तक्रार माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी देखील त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. ढेंगळे-पाटील यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई करू, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरेश पाटील यांना दिली.
पालकमंत्र्यांनी शनिवारी सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी सुरेश पाटील यांनी ढेंगळे पाटील यांच्या विरोधात पालकमंत्र्यांकडे तक्रार केली. महानगरपालिकेवर प्रशासक आहे. प्रशासक माजी नगरसेवकांचे ऐकत नाहीत. मनपात मनमानी कारभार सुरू आहे. इकडे वाॅर्डात खूप तक्रारी येत आहेत. नागरिक चिडले आहेत. आमच्यावर राग व्यक्त करतात, अशा तक्रारी भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांकडे केल्या. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना प्रतिसाद देत रखडलेल्या कामांची यादी शहर अध्यक्षांकडे द्या. यादीनुसार प्रशासकांना कामे करण्याची सूचना करणार आहे. जर कामे होत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करू, असे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.