साेलापूर -खासगी आणि सरकारी रुग्णालयांनी बाळाच्या जन्मानंतर २१ दिवसांच्या आत जन्माची वार्ता पालिकेला कळविणे अपेक्षित आहे. या वार्ता न कळविणाऱ्या रुग्णांलयांवर कारवाई हाेईल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी सांगितले.
महापालिकेतून जन्म व मृत्यू दाखले ऑफलाइन आणि ऑनलाइन दिले जात आहेत. परंतु, या कार्यालयातील सेवेबद्दल आणि येथील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत. यापार्श्वभूमीवर आयुक्त पी. शिवशंकर यांनी आराेग्य अधिकारी डाॅ. बसवराज लाेहारे आणि या कार्यालयाच्या प्रमुख डाॅ. अरुंधती हराळकर यांच्याकडून कामांचा आढावा घेतला. रुग्णालयांकडून जन्म वार्ता येत नाहीत. त्यामुळेच दाखले देण्यात अडचणी येतात. नागरिकांनी रुग्णालयांकडे पाठपुरावा करावा. रुग्णालये प्रतिसाद देत नसतील कावाई हाेईल.
--
मृत्यू दाखल्यांसाठी नियमावली निश्चित करणार
नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींचा मृत्यू दाखला काढण्यात नागरिकांना अनेक अडचणी येत आहे. नैसर्गिक मृत्यूबाबत डाॅक्टरांचा अहवाल द्या, अंत्यसंस्कार कुठे झाले याची प्रमाणित माहिती द्या या नियमित अटींसह एेनवेळी इतर अटी सांगितल्या जातात. या विषयावर ताेडगा काढण्यासाठी एक नियमावली तयार करून नागरिकांना कळविण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
जन्म-मृत्यू नाेंदणी कार्यालयाचा कामाचा आढावा
- पालिकेला वर्षभरात जन्म व मृत्यू दाखल्यासंदर्भात एकूण ४१ हजार २६ अर्ज प्राप्त झाले.
- यापैकी ३० हजार ९ अर्ज निकाली काढून दाखले दिले.
- ८ हजार ७०७ अर्ज फेटाळून लावले. यात त्रुटी असल्याचे आराेग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
- ४८४ अर्जदारांकडून अधिकची कागदपत्रे मागविली.
- १८२६ अर्ज अजूनही प्रलंबित आहेत.