मंगळवेढा तालुक्यातील मतदार संख्या जवळजवळ १ लाख ७९ हजार असून यामध्ये ८१ गावे आहेत. चार जिल्हा परिषद गट तर आठ पंचायत समिती गण आहेत.
सध्या समाधान आवताडे व दिवंगत आ. भारत भालके यांचे कार्यकर्ते ग्रामीण भागात सरपंच, उपसरपंच व इतर राजकीय नेत्यांच्या प्रत्येक गावात जाऊन गाठीभेटीवर जोर देऊ लागले आहेत.
कार्यकर्त्यांकडून प्रत्येक गावात, वाडीवस्तीवर जाऊन निवडणूक संदर्भात चर्चा केली जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी काय मदत लागते याची विचारपूस करून निवडणूक कशी जिंकता येईल, याचे नियोजन केले जात आहे.
प्रत्येक गटामध्ये पाच ते दहा कार्यकर्त्यांना नियोजन दिले असून प्रत्येक घडामोडींची माहिती आपापले कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवत आहेत. काही नागरिकही मजुरी, ऊस तोडणी कामगार म्हणून सांगली, कोल्हापूर, कराड आदी भागांत जातो. यावर्षी कारखान्यांचा हंगाम लवकर संपल्याने ते नागरिक आपापल्या गावी परतले आहेत. त्या सर्वच मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला जात आहे.
भाजपकडून दामाजीचे चेअरमन समाधान अवताडे व विधान परिषद सदस्य प्रशांतराव परिचारक आणि दिवंगत आ. भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके व आ. भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांच्याशिवाय आणखी कुणाला तिकीट मिळते याबद्दलची उत्सुकता लागून राहिली आहे.