टेंभुर्णी : सोलापूर - पुणे महामार्गावर समोरच्या वाहनचालकाने अचानक ‘ब्रेक’ दाबल्याने पाठीमागून येणारे वाहन धडकले. यातील एक गाडी अभिनेते महेश मांजरेकर यांची होती. त्यांनी गाडीतून उतरुन चौकशी न करता, नुकसान भरपाईची मागणी करत टेंभुर्णीतील कैलास सातपुते यांना मारहाण केली. यावेळी पोलीस ठाण्याला चला म्हणताच त्यांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात मांजरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी रात्री ९.३०च्या दरम्यान ही घटना घडली.
सातपुते यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री ९.३०च्या सुमारास टेंभुर्णी येथील शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष कैलास सातपुते हे (एमएच ४५ / एएल ००१९) या आपल्या चारचाकी गाडीतून पुण्याकडून टेंभुर्णीकडे येत होते. यवतच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर ते आले असता (एमएच ०१ / डीएल १९००) ही महागडी चारचाकी गाडी सातपुते यांच्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे आली. परंतु, या गाडीच्या पुढे टमटम असल्याने चालकाने अचानक ‘ब्रेक’ दाबला व गाडी जागेवर थांबली.
यावेळी अचानक ब्रेक लावल्याने या चारचाकीला पाठीमागून सातपुते यांची चारचाकी धडकली. दोन्ही गाड्या थांबल्यानंतर ‘त्या’ महागड्या गाडीतून अभिनेते महेश मांजरेकर व त्यांचे साथीदार खाली उतरले. यावेळी नुकसान भरपाईची मागणी करून मारहाण करू लागले. नुकसान भरपाईची रक्कम देतो म्हणत असतानाही मांजरेकर यांनी सातपुते यांना हाताने गालावर चापटा मारल्या.
यावेळी सातपुते यांनी मांजरेकर यांना पोलीस स्टेशनला चला म्हणताच त्यांनी तेथून काढता पाय घेतला. यानंतर कैलास सातपुते यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, यवत पोलिसांनी भादंवि कलम ३२३, ५०४ व ५०६नुसार गुन्हा दाखल केला आहे.
----